घोगरगाव (ता. श्रीगोंदा) : रयत शिक्षण संस्था अंतर्गत कार्यरत श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, घोगरगाव येथे माजी विद्यार्थी संघटनेच्या अधिकृत नोंदणी प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर आयोजित सहविचार सभा उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडली. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शाळेबद्दलची आपुलकी आणि बांधिलकी व्यक्त केली.
सभेच्या अध्यक्षस्थानी जनरल बॉडी सदस्य मा. बाबासाहेब भोस होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शिक्षण चळवळीचा वारसा जपत तो अधिक व्यापक करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी संघटित होणे काळाची गरज असल्याचे ठामपणे सांगितले. “शाळेने दिलेल्या संस्कारांची परतफेड करण्याची हीच योग्य वेळ आहे. संघटनेच्या माध्यमातून आपण विद्यालयाच्या प्रगतीत थेट आणि प्रभावी योगदान देऊ शकतो,” असे ते म्हणाले.
प्राचार्य श्री. वसंत नरवडे यांनी माजी विद्यार्थी संघटनेच्या स्थापनेमागील संकल्पना स्पष्ट करताना सांगितले की, माजी विद्यार्थ्यांचे विद्यालयाशी स्नेहबंध कायम ठेवणे, हीच या उपक्रमाची मुख्य प्रेरणा आहे. विद्यालयाची आर्थिक बळकटी, शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी, वैचारिक समृद्धी तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस आणि नियोजनबद्ध पावले उचलण्यासाठी संघटना प्रभावी व्यासपीठ ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शैक्षणिक, सामाजिक आणि विकासात्मक उपक्रमांच्या माध्यमातून संतुलित व सर्वांगीण विकास साधण्याचा मानसही त्यांनी मांडला.
या सभेस सरपंच सुजाता भोसले, उपसरपंच डॉ. दिलीप भोस, राजेंद्र उगले, बिभीषण उगले, सेवानिवृत्त प्राचार्य अविनाश गांगर्डे, अर्जुन उगले गुरुजी, पत्रकार उज्वलाताई उल्हारे, डॉ. सुधीर गुंजाळ, दिलीप जाधव, भगवान साळुंके, कृषी सहाय्यक मिलिंद भोसले, समीर शेख गुरुजी, आदिक उगले, महेश बोरुडे, प्रवीण लुणिया, आदिल शेख आदी मान्यवर माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेच्या अखेरीस माजी विद्यार्थी संघटनेची अधिकृत स्थापना व नोंदणी करण्याचा एकमताने ठोस निर्णय घेण्यात आला. लवकरच कार्यकारिणी जाहीर करून पुढील कार्ययोजना निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यालयाच्या आर्थिक, शैक्षणिक, वैचारिक आणि सुरक्षा क्षेत्रात नवचैतन्य निर्माण होऊन सर्वांगीण विकासाला नवे बळ मिळेल, असा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला.
