हजारो दिव्यांनी उजळल्या ऐतिहासिक बारवा; महाशिवरात्रीला वारसा जतनाचा अनोखा दीपोत्सव……

श्रीगोंदा | दि. १९ फेब्रुवारी २०१६

 गणेश कविटकर

 

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त बारव दीपोत्सव – पाचवे वर्ष उत्साहात साजरे

 

श्रीगोंदा, ता. श्रीगोंदा : महाराष्ट्र बारव मोहिमेअंतर्गत यंदाच्या महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर राज्यभरातील अनेक ऐतिहासिक व पुरातन बारवांवर दीपोत्सव साजरा करण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात देऊळगाव गलांडे, खंडोबा मंदिर परिसर श्रीगोंदा, काशीबारव (मांडवगण रोड) व बेलवंडी कोठार येथील बारवांवर हजारो मातीच्या दिव्यांनी उजळून निघालेल्या दीपोत्सवाने वारसा जतनाचा प्रेरणादायी संदेश दिला.

देऊळगाव गलांडे येथे गावकरी, जगदंब युवा प्रतिष्ठान व शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील प्राचीन चालुक्यकालीन बारव परिसरात आकर्षक रोषणाई व सजावट करण्यात आली. तरुणाई, महिला व भाविकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत केदारेश्वर महादेवाचे दर्शन घेतले. अनेक महिलांनी आपल्या घरून पाच दिवे आणून बारव परिसरात प्रज्वलित केले. केदारेश्वर महादेवाच्या आरतीने दीपोत्सवाला भक्तिमय रंग चढला आणि उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम सलग पाचव्या वर्षी यशस्वीरीत्या पार पडला.

दररोज नजरेसमोर असतानाही दुर्लक्षित राहिलेला हा वारसा जपण्याचा निर्धार तरुणांनी केला आहे. “बारव ही आपली संस्कृती आणि इतिहास आहे. ती बांधण्यासाठी हात नसले तरी जपण्यासाठी हात पुढे आले पाहिजेत,” या भावनेतून युवकांनी टीमवर्कच्या बळावर हा उपक्रम उभारला आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ मध्ये ‘मन की बात’ कार्यक्रमात देऊळगाव येथील बारवची दखल घेतल्यानंतर या दीपोत्सवाला नवी ऊर्जा मिळाली. त्यानंतर दरवर्षी अधिक उत्साहाने हा उपक्रम राबविला जात आहे.

महाराष्ट्र बारव मोहिमेचे नेतृत्व रोहन काळे करत असून ही एक लोकचळवळ बनली आहे. वारसा स्थळांचा इतिहास व महत्त्व नागरिकांना पटवून दिल्यास ते जतनासाठी पुढे येतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा दीपोत्सव होय. पुढील पिढ्यांसाठी या ऐतिहासिक बारवा जतन करण्याचा संकल्प यावेळी पुन्हा दृढ करण्यात आला.

दीपोत्सव यशस्वी करण्यासाठी शिवदुर्गचे अध्यक्ष राजेश इंगळे, मारुती वागस्कर, दिगंबर भुजबळ, अमोल बडे, सचिन भोसले, ॲड. गोरख कडुस, ईश्वर कोठारे, अक्षय ओहळ, संगिता इंगळे, डॉ. स्मिता तरटे, देऊळगावचे सरपंच महेश गायकवाड, राहुल नवले, किरण नवले, शंकर दांगडे, वैभव दांगडे, आनंद झराड तसेच शिवदुर्ग शिलेदार टीम, जगदंब युवा प्रतिष्ठान देऊळगाव गलांडे, जय भवानी तरुण मित्र मंडळ बेलवंडी कोठार आणि समस्त ग्रामस्थांनी मोलाचे योगदान दिले.

इतिहास, श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम साधणारा हा बारव दीपोत्सव वारसा संवर्धनाच्या चळवळीला नवी प्रेरणा देणारा ठरला आहे.