श्रीगोंदा : दि. १६ जुलै २०२६
गणेश कविटकर
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा शहराचे ग्रामदैवत तसेच हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रेरणास्थान असलेले श्री. संत शेख महंमद महाराज यांच्या पालखी उत्सव सोहळ्याचे बुधवारी अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पंढरपूरकडे प्रस्थान झाले. संतांच्या समता, बंधुभाव आणि मानवतेच्या शिकवणीचा संदेश देणाऱ्या या पालखी सोहळ्याने पुन्हा एकदा राष्ट्रीय एकात्मता आणि आध्यात्मिक संस्कृतीचे दर्शन घडविले.
यंदा या पालखी सोहळ्याचे चौथे वर्ष असून, सुमारे अडीच ते तीन हजार वारकरी या वारीत सहभागी झाले आहेत. संत तुकाराम महाराजांच्या परंपरेतील मानाची बैल जोडी पालखीसोबत सहभागी झाल्याने सोहळ्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधिकच अधोरेखित झाले.
पालखी प्रस्थानापूर्वी श्री. संत शेख महंमद महाराज मंदिरात पादुकांचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर मानाच्या बैल जोडीसह पालखीने संपूर्ण श्रीगोंदा शहराला प्रदक्षिणा घातली. मार्गावर ठिक ठिकाणी नागरिकांनी फुलांची उधळण करून पालखीचे स्वागत केले. घरांसमोर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. टाळ-मृदंगाचा गजर, विठ्ठल नामाचा अखंड जयघोष, अभंग आणि भजनांनी संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि बाल वारकरी यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.
पालखी सोहळा समितीच्या वतीने पंढरपूरपर्यंतच्या संपूर्ण प्रवासासाठी वारकऱ्यांच्या भोजन, निवास, पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा आणि सुरक्षिततेची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली आहे. श्रीगोंद्यातून निघालेली ही पालखी २४ जुलै रोजी श्री विठ्ठल – रुक्मिणीच्या चरणी पंढरपूर येथे दाखल होणार आहे.
यावेळी आमदार विक्रमसिंह पाचपुते, घनश्याम शेलार, पालखी सोहळा समितीचे आयोजक अशोक आळेकर तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी संत शेख महंमद महाराजांच्या समतेच्या, प्रेमाच्या आणि मानवतेच्या विचारांचा वारसा जपत समाजात ऐक्य, सद्भावना आणि भक्तीची परंपरा अधिक दृढ करण्याचे आवाहन केले.
संत शेख महंमद महाराजांचा संदेश
“जात-पात, धर्मभेद विसरून मानवतेची सेवा आणि ईश्वरभक्ती हेच खरे जीवनमूल्य,” हा संत शेख महंमद महाराजांचा विचार आजही वारकरी परंपरेतून समाजाला राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव आणि आध्यात्मिकतेची प्रेरणा देत आहे.
