श्री क्षेत्र कोंभळी ते श्री क्षेत्र मढी पायी दिंडीचे भक्तिमय प्रस्थान; नाथांच्या नामगजरात परिसर दुमदुमला….

ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग; शिस्तप्रिय दिंडीने वेधले सर्वांचे लक्ष.

कोंभळी|दि. 06 मार्च 2026

गणेश कविटकर

कर्जत तालुक्यातील श्री क्षेत्र कोंभळी येथून श्री क्षेत्र मढीकडे निघालेल्या पायी दिंडी प्रस्थान सोहळ्याने परिसरात भक्तीचा उत्सवच निर्माण झाला. टाळ-मृदुंगाच्या गजरात, अभंगांच्या सुरेल निनादात आणि नाथ महाराज्यांच्या घोषणांनी वातावरण भक्तिरसाने भारावून गेले.

ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडीचे अत्यंत भक्तिभावाने प्रस्थान झाले. हजारो भाविकांनी या पवित्र दिंडीत सहभागी होत नाथांप्रती असलेली आपली श्रद्धा आणि निष्ठा व्यक्त केली. लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वच वयोगटातील भाविक मोठ्या उत्साहाने या दिंडीमध्ये सामील झाले होते.

“शिस्तप्रिय दिंडी” अशी ओळख असलेल्या या दिंडीमध्ये भक्तांनी अत्यंत नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध पद्धतीने पायी प्रवासाला सुरुवात केली. नाथांच्या गजरात आणि नामस्मरणात पुढे सरकणाऱ्या या दिंडीमुळे मार्गातील गावांमध्येही भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, ठिकठिकाणी दिंडीचे स्वागत करण्यात येत आहे.

नाथांच्या नामगजरात पुढे सरकणारी ही पायी दिंडी केवळ एक धार्मिक यात्रा नसून, ती श्रद्धा, भक्ती, संस्कार आणि एकतेचा पवित्र संगम आहे. गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली हजारो भाविकांनी एकदिलाने सुरू केलेला हा प्रवास नाथभक्तीचा अखंड झरा असल्याची भावना सर्वांच्या मनात दाटून आली.