बोल्हेगाव फाटा स्वामी समर्थ केंद्रात रविवारी २५ हजार भाविकांचे सामूहिक स्वामी चरित्र पारायण

अध्यात्म, संस्कार आणि समाजजागृतीचा अनोखा संगम; आबालवृद्धांना सहभागाचे आवाहन

 

अहिल्यानगर, दि. २२ जुलै २०२६

 

श्री स्वामी समर्थांच्या अखंड कृपाछायेखाली अध्यात्म, संस्कार आणि समाजसेवेचा दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या बोल्हेगाव फाटा येथील संत तुकाराम नगरमधील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र (दिंडोरी प्रणित) येथे रविवारी (ता. २६ जुलै) सकाळी ८ ते ११ या वेळेत २५ हजार भाविकांच्या उपस्थितीत भव्य सामूहिक श्री स्वामी चरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दिव्य सोहळ्यात जिल्ह्यासह परजिल्ह्यातील हजारो स्वामीभक्त सहभागी होणार असून संपूर्ण परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघणार आहे.

केंद्राचे प्रमुख चंद्रशेखर (काका) लोळगे यांच्या प्रेरणेतून साकारत असलेला हा उपक्रम गेल्या २५ वर्षांच्या अखंड सेवायज्ञाचा परिपाक मानला जात आहे. अत्यंत अल्प सुविधांमध्ये सुरू झालेल्या या केंद्राने आज हजारो भाविकांच्या श्रद्धेचे, विश्वासाचे आणि आध्यात्मिक ऊर्जेचे प्रेरणास्थान म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे.

स्वामी समर्थांच्या नामस्मरणातून आणि चरित्राच्या अभ्यासातून अनेक युवकांनी व्यसन, नैराश्य व भरकटलेल्या जीवनाला कायमचा रामराम ठोकत नव्या उमेदीनिशी उद्योग-व्यवसाय, शिक्षण आणि नोकरीच्या क्षेत्रात यशस्वी वाटचाल केली आहे. “भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे” हा स्वामींचा संदेश असंख्य कुटुंबांसाठी नवजीवनाचा आधार ठरला असल्याचा अनुभव अनेक सेवेकऱ्यांनी घेतला आहे.

केंद्रातील बालसंस्कार विभागासह १८ विविध विभागांच्या माध्यमातून समाजमनात संस्कार, सेवा, शिस्त आणि अध्यात्माची मूल्ये रुजविण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे. त्यामुळे आज या केंद्रात सर्व समाजघटकांतील भाविक मोठ्या श्रद्धेने येत असून गुरुवार आणि रविवार या दिवशी विशेष गर्दी होत असते.

बोल्हेगाव परिसराचा झपाट्याने झालेला विकास आणि केंद्रावरील वाढता भाविकांचा विश्वास यामुळे आज जिल्ह्यासह परजिल्ह्यातूनही स्वामीभक्त येथे दर्शनासाठी आणि सेवेसाठी आवर्जून येत आहेत. अनेकांना स्वामींच्या कृपेची अनुभूती मिळाल्याने हे केंद्र असंख्य भक्तांच्या श्रद्धेचे अधिष्ठान बनले आहे.

रविवारी होणाऱ्या या भव्य सामूहिक श्री स्वामी चरित्र पारायण सोहळ्यात आबालवृद्ध, महिला, युवक-युवती आणि सर्व वयोगटातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन श्री स्वामींच्या कृपाशीर्वादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्राचे प्रमुख चंद्रशेखर (काका) लोळगे यांनी केले आहे.