बुद्धिबळात श्रीगोंद्याच्या पियूष सुजित गायकवाडची दमदार झेप; बारामतीतील राज्यस्तरीय स्पर्धेत चौथा क्रमांक

श्रीगोंदा | दि. २२ जुलै २०२६

 

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिनानिमित्त बारामती येथील Immortal Chess Academy यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत श्रीगोंदा तालुक्यातील अवघ्या आठ वर्षीय पियूष सुजित गायकवाड याने अंडर-10 गटात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत चौथा क्रमांक पटकावला. पहिल्याच मोठ्या स्पर्धेत केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे पियूषने सर्वांचे लक्ष वेधून घेत श्रीगोंदा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

विशेष म्हणजे, कोणतेही व्यावसायिक बुद्धिबळ प्रशिक्षण किंवा क्लासेस न घेता, केवळ स्वतःच्या बुद्धिमत्ता, निरीक्षणशक्ती, सातत्यपूर्ण सराव आणि आत्मविश्वासाच्या जोरावर पियूषने हे यश संपादन केले. स्पर्धेतील अनुभवी खेळाडूंना कडवी झुंज देत त्याने अव्वल खेळाडूंमध्ये स्थान मिळवले.

या स्पर्धेत बारामती, पुणे, दौंड, नीरा, अहिल्यानगरसह राज्यातील विविध जिल्ह्यांतील अनेक गुणवंत स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. अशा उच्च दर्जाच्या स्पर्धेत श्रीगोंदा तालुक्याचे प्रतिनिधित्व करत पियूषने आपल्या बुद्धिमत्तेची आणि खेळातील कौशल्याची प्रभावी छाप उमटवली.

पियूष हा केवळ बुद्धिबळापुरताच मर्यादित नसून इतर क्षेत्रातही उल्लेखनीय प्रगती करत आहे. कराटे या खेळात त्याने ब्ल्यू बेल्ट प्राप्त केला असून, अबॅकस (Abacus) राज्यस्तरीय परीक्षेत द्वितीय क्रमांक मिळवत आपल्या बहुआयामी गुणवत्तेचा ठसा उमटवला आहे.

पियूषच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, भविष्यात राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरही तो उल्लेखनीय कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्याच्या या यशामुळे गायकवाड कुटुंबासह संपूर्ण श्रीगोंदा तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.