मातीच्या आरोग्याशिवाय शेतीची प्रगती अशक्य; श्रीगोंद्यात राम मुखेकर यांचे प्रतिपादन

श्रीगोंदा | दि. २३ जुलै २०२६

गणेश कविटकर

 

जमिनीची सुपीकता टिकवून मातीचे आरोग्य सुदृढ केले, तरच शेती उत्पादनात वाढ होऊन शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, असे प्रतिपादन SCT वैदिकचे संस्थापक राम मुखेकर यांनी केले. तालुक्यातील आढळगाव येथे प्रगतिशील शेतकरी विठ्ठल शिंदे यांच्या डाळिंब बागेत आयोजित शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी परिसरातील विविध शेतांना तसेच गोठ्यांना भेट देत शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. वैदिक शेती, जैविक शेती, नैसर्गिक शेती पद्धती, मातीचे संवर्धन आणि पीक व्यवस्थापन याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

मुखेकर म्हणाले, आज रासायनिक शेतीमुळे जमिनीचा कस कमी होत असून त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मातीचे परीक्षण, सेंद्रिय घटकांची वाढ आणि नैसर्गिक पद्धतींचा अवलंब करून जमिनीचे आरोग्य सुधारण्यावर भर द्यावा. माती सुदृढ असेल, तर पिकांची गुणवत्ता, उत्पादन आणि शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

BSCT वैदिकच्या माध्यमातून राज्यभरातील शेतकऱ्यांना माती पुनरुज्जीवन, जैविक शेती आणि नैसर्गिक शेती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जात असून हजारो शेतकरी त्याचा लाभ घेत असल्याची माहिती त्यांनी दिली. “माती बलवान तर पीक पैलवान, आणि पीक पैलवान तर शेतकरी धनवान,” हा संदेश देत त्यांनी शाश्वत शेतीसाठी माती संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले.

यावेळी SCT वैदिकचे अहिल्यानगर, बीड व पुणे जिल्हा प्रमुख शेखर वाकचौरे यांनीही मातीतील सेंद्रिय कर्ब वाढविणे, सूक्ष्म अन्नद्रव्यांचे संतुलन राखणे आणि जैविक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उत्पादन खर्च कमी होऊन पिकांची गुणवत्ता वाढते, असे सांगितले. कार्यक्रमास सुहास एंटरप्राइजेसचे सुहास राऊत, अमृता राऊत यांच्यासह आढळगाव व परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांनी वैदिक शेतीतील स्वतःचे अनुभव मांडत SCT वैदिकच्या मार्गदर्शनामुळे शेतीत सकारात्मक बदल होत असल्याची भावना व्यक्त केली.