अहिल्यानगरसह तीन जिल्ह्यांतील १.४५ लाख हेक्टर शेतीला लाभ; दक्षिण नगरच्या दुष्काळमुक्तीला मोठी चालना
श्रीगोंदा | दि. ०१ सप्टेंबर २०२६
गणेश कविटकर
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या डिंबे–माणिकडोह बोगदा प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याने दक्षिण अहिल्यानगरच्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या पाणीप्रश्नाला निर्णायक दिशा मिळाली आहे. सुमारे १६ किलोमीटर लांबीच्या या बोगद्याद्वारे डिंबे धरणातील अतिरिक्त पाणी माणिकडोह धरणात वळविण्यात येणार असून, त्याचा मोठा फायदा कुकडी डावा कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतीला होणार आहे.
याचबरोबर कुकडी पाटबंधारे प्रकल्पाच्या सुधारित खर्चास ₹५,७०४.५० कोटींची मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यांतील सुमारे १,४४,९१२ हेक्टर सिंचन क्षमतेला बळकटी मिळणार आहे. जुन्नर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत आणि करमाळा तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी हा निर्णय विशेष महत्त्वाचा मानला जात आहे.
डिंबे धरण व त्याखालील घोड धरण भरल्यानंतर पावसाळ्यात वाहून जाणारे अतिरिक्त पाणी बोगद्याद्वारे माणिकडोह धरणात साठविले जाणार आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा अधिक कार्यक्षम वापर होऊन कुकडी डावा कालव्याच्या लाभक्षेत्रातील सिंचनाला मोठा आधार मिळणार आहे.
“दक्षिण नगरच्या शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पूर्ण करण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा आहे. साकळाई योजनेनंतर आता डिंबे–माणिकडोह बोगद्याचा प्रश्न मार्गी लागला आहे,” अशी प्रतिक्रिया माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी पुढील पाठपुरावा सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या निर्णयाबद्दल डॉ. सुजय विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवार, जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले. तसेच माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांनी या प्रश्नासाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
या प्रकल्पामुळे पावसावर अवलंबून असलेल्या शेतीला सिंचनाचा अधिक शाश्वत आधार मिळून दक्षिण अहिल्यानगरच्या दुष्काळी पट्ट्यात शेती उत्पादन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
