दररोज सुरू राहणार बाजार समिती; शेतकरी, व्यापारी आणि मत्स्य व्यवसायिकांना मोठा दिलासा.
श्रीगोंदा | दि. ०३ जुलै २०२६
गणेश कविटकर
श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथे शासनाच्या मंजुरीनंतर अवघ्या सहा महिन्यांत कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपबाजार प्रत्यक्ष कार्यान्वित होत असून, त्याचबरोबर अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिले आधुनिक मच्छी मार्केट येथे सुरू होणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केली.
बाजार समितीचे सभापती, उपसभापती तसेच सर्व संचालक यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती देताना सांगितले की, शेतकरी, व्यापारी आणि मत्स्य व्यवसायिकांच्या सोयीसाठी पेडगाव उपबाजारात दररोज नियमित व्यवहार सुरू राहणार आहेत. त्यामुळे शेतमालासह मत्स्य व्यवसायालाही मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळणार आहे.
पेडगाव उपबाजार सुरू झाल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना शेतीमालाची विक्री स्थानिक पातळीवरच करता येणार आहे. वाहतूक खर्चात बचत, वेळेची बचत आणि स्पर्धात्मक दर मिळण्यास मदत होणार असून व्यापाऱ्यांसाठीही व्यवहार अधिक सुलभ होणार आहेत.
विशेष म्हणजे, अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिले मच्छी मार्केट पेडगाव येथे सुरू होणार असल्याने मत्स्य व्यवसायिकांसाठीही हा ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे. ताज्या माशांच्या विक्रीसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध होणार असून ग्राहकांनाही दर्जेदार आणि ताजा माल एकाच ठिकाणी मिळणार आहे.
पत्रकार परिषदेत पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, उपबाजारात आवश्यक पायाभूत सुविधा टप्प्याटप्प्याने उभारल्या जात असून भविष्यात कृषी, फळे-भाज्या, धान्य तसेच मत्स्य व्यवसायासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामुळे पेडगाव परिसर भविष्यात कृषी व मत्स्य व्यापाराचे महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून विकसित होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शेतकरी हित, व्यापारी सुलभता आणि ग्रामीण विकासाचा नवा अध्याय सुरू करणारा हा उपक्रम श्रीगोंदा तालुक्यासाठी ऐतिहासिक ठरणार असल्याची भावना पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आली.
