ओंकार शुगर ग्रुपकडून शेतकऱ्यांचे एक रुपयाही थकवणार नाही – ओमराजे बोत्रेपाटील

श्रीगोंदा | दि. 07 मे 2026

गणेश कविटकर

बाबुराव बोत्रेपाटील यांच्या नेतृत्वाखाली ओंकार शुगर ग्रुपच्या माध्यमातून महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक या तीन राज्यांतील बंद पडलेले अथवा अडचणीत सापडलेले तब्बल 17 साखर कारखाने पुन्हा सुरू करण्यात आले असून, सुमारे 11 लाख ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोड मजूर व वाहतूकदारांना आर्थिक न्याय देण्याचे काम करण्यात आले आहे. शेतकऱ्यांचे केवळ एका महिन्याचे ऊस बिल बाकी असून, शेतकरी व ऊस वाहतूकदारांची सर्व देणी लवकरच अदा करण्यात येतील. कुणाचाही एक रुपया थकवला जाणार नाही, अशी माहिती ओंकार शुगर ग्रुपचे संचालक ओमराजे बोत्रेपाटील यांनी दिली.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, ओंकार शुगर ग्रुपने तीन राज्यांमधील 17 साखर कारखाने चालवत 75 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले आहे. यामध्ये शेतकऱ्यांना तब्बल 1 हजार 830 कोटी रुपयांचे ऊस बिल अदा करण्यात आले असून, ऊसतोड मजूर व वाहतूकदारांना 710 कोटी रुपयांची देयके देण्यात आली आहेत. तसेच 18 हजार साखर कामगारांच्या रोजगाराला पुन्हा चालना देण्याचे कामही समूहाने केले असल्याचे त्यांनी नमूद केले.

या गाळप हंगामातून सुमारे 6 हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली असून, ग्रामीण भागातील अर्थकारणाला गती देण्याचा छोटासा प्रयत्न ओंकार समूहाच्या माध्यमातून करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

येत्या गाळप हंगामात 21 साखर कारखाने चालवून 1 कोटी मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट असून, त्यातून सुमारे 7 हजार कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित असल्याचेही बोत्रेपाटील यांनी स्पष्ट केले.

केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार पेट्रोल आणि डिझेलमध्ये 33 टक्के इथेनॉल मिश्रणास परवानगी मिळणार असल्याने ओंकार समूहाने मोठ्या प्रमाणात मोलॅसेसचा साठा करून ठेवला आहे. या निर्णयातून समूहाला सुमारे 600 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, राज्यातील सुमारे 140 खाजगी व सहकारी साखर कारखान्यांकडे एफआरपीपोटी 2 हजार 100 कोटी रुपयांची देणी बाकी असताना, काही मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओंकार ग्रुपकडे 2 ते 3 हजार कोटी रुपयांची ऊसबिले थकीत असल्याच्या अफवा पसरवत असल्याचा आरोपही त्यांनी केला. अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले.

“बाबुराव बोत्रेपाटील यांचे एकच ध्येय असून शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव देत ऊस उत्पादक, ऊसतोड मजूर आणि वाहतूकदार यांच्या प्रगतीसाठी काम करणे हेच आमचे उद्दिष्ट आहे,” असेही ओमराजे बोत्रेपाटील यांनी शेवटी नमूद केले.