श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्याच्या वाढत्या दहशतीमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रात्रीच्या वेळी कृषी पंपासाठी शेतात जाणे धोकादायक ठरत आहे. या पार्श्वभूमीवर कृषी पंपांची वीजपुरवठा लाईट दिवसा करण्यात यावी, या मागणीसाठी श्रीगोंदा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज श्रीगोंदा येथील महावितरण (एमएसईबी) अभियंता यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनाद्वारे शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा मांडत, बिबट्याच्या हल्ल्याची भीती लक्षात घेता रात्रीच्या ऐवजी दिवसा वीजपुरवठा देणे अत्यंत आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांचे प्राण वाचण्यास मदत होणार असून कृषी कामेही सुरळीत होतील, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या वेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत भैय्या ओगले, श्रीगोंदा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संतोष भोईटे, श्रीगोंदा शहर काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. समित बुरुडे, सचिन गायकवाड, माजी सरपंच डॉ. गोरख बायकर, वडाळी गावचे सरपंच महेश दरेकर, माजी चेअरमन शंकर कोठारी, सुरज शेख, आफ्रिद इनामदार, भाऊ गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या जिविताचा प्रश्न गंभीर असून प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. महावितरणने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.
(गणेश कविटकर, श्रीगोंदा)
