श्रीगोंदा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने २२ पैकी तब्बल १३ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले असून, नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीत भाजपच्या सुनिता खेतमाळीस यांनी शिवसेना (शिंदे गट)च्या शुभांगी पोटे यांचा १,०३७ मतांनी पराभव करत विजयी झेंडा फडकावला. या निकालामुळे भाजपने नगरपालिकेवर आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.
या निवडणुकीत भाजपचे आमदार विक्रम पाचपुते यांनी निवडणूक व्यवस्थापन, योग्य उमेदवार निवड आणि शेवटच्या टप्प्यातील रणनीती यांद्वारे आपले नेतृत्व पुन्हा एकदा अधोरेखित केले. विशेष बाब म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे नेते मनोहर पोटे यांनी दोन प्रभागांतून निवडणूक लढवली; मात्र दोन्ही ठिकाणी त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
चार पॅनल, पण प्रत्यक्षात दुरंगी लढत –
नगराध्यक्ष एक व नगरसेवक पदाच्या २२ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत इतिहासात प्रथमच चार पॅनल रिंगणात उतरले होते. मात्र प्रत्यक्ष निवडणूक ही भाजप विरुद्ध शिवसेना (शिंदे गट) अशीच रंगली. निवडणूक काळात कुठलाही गाजावाजा न करता प्रचार शांततेत पार पडला, हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले.
अजित पवार गट व महाविकास आघाडीची नामुष्की
या निवडणुकीत अजित पवार गटाचा एकही नगरसेवक निवडून आला नाही, ही बाब तालुक्यातील राजकीय समीकरणांसाठी धक्कादायक मानली जात आहे. तसेच महाविकास आघाडीचीही कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली. बडे नेते असतानाही पालिकेत प्रतिनिधित्व मिळवण्यात अपयश आल्याने संबंधित गटांची मोठी राजकीय नाचक्की झाली आहे.
पाचपुतेंची ‘मास्टरस्ट्रोक’ रणनीती –
नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीबाबत आमदार विक्रम पाचपुते यांनी शेवटपर्यंत सस्पेन्स कायम ठेवला. अंतिम टप्प्यात सुनिता खेतमाळीस यांना उमेदवारी देत त्यांनी राजकीय वर्तुळाला धक्का दिला. सुरुवातीला शिवसेना गटाला सोपी वाटणारी ही निवडणूक अंतिम टप्प्यात कसोटीची ठरली. पाचपुते यांनी अडचणीच्या ठिकाणी स्वतः उपस्थित राहून केलेल्या वाटाघाटी निर्णायक ठरल्या आणि त्याचा थेट फायदा भाजपला झाला.
नगराध्यक्ष पदाचा निकाल (थेट निवडणूक)
सुनिता खेतमाळीस (भाजप) – १०,६९९ मते
शुभांगी पोटे (शिवसेना – शिंदे गट) – ९,६६२ मते
ज्योती खेडकर (अजित पवार गट) – १,७६४ मते
गौरी भोस (महाविकास आघाडी) – ३४२ मते
महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळालेली अत्यल्प मते राजकीय विश्लेषकांच्या दृष्टीने धक्कादायक मानली जात आहेत.
पोटे यांचा पाडाव : पडद्यामागची रणनीती –
प्रभाग क्रमांक ३ मध्ये जावेद सय्यद यांची उमेदवारी मनोहर पोटे यांच्या पाडावासाठी निर्णायक ठरली. सय्यद यांनी ४४४ मते घेतली; मात्र मच्छिंद शिंदे यांनी त्यांचा १६९ मतांनी पराभव केला. ही उमेदवारी पाचपुतेंची रणनीती असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. प्रभाग क्रमांक ७-ब मध्ये अलका अनभुले यांनी मनोहर पोटे यांचा ८६ मतांनी पराभव केला.
मतमोजणी व निकालाचा कल मतमोजणीला सकाळी १० वाजता सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासूनच सुनिता खेतमाळीस यांनी घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली, ज्यामुळे भाजपचा विजय निश्चित झाला.
सर्वाधिक व सर्वात कमी मताधिक्याचे उमेदवार –
सर्वाधिक मताधिक्य :
प्रशांत गोरे – ८३१ मतांनी विजयी
बंटी बोरुडे – ७१० मतांनी विजयी
सोनाली सागर गोरे – ६८९ मतांनी विजयी
सर्वात कमी मताधिक्य :
राजेंद्र खेडकर – १ मताने विजयी
पल्लवी पांडुरंग पोटे – ८ मतांनी विजयी
दिपाली बोरुडे – ९ मतांनी विजयी
विजयानंतर आमदार विक्रम पाचपुते यांची प्रतिक्रिया –
“जनतेने आमच्यावर दाखवलेला विश्वास म्हणजे श्रीगोंद्याच्या विकासाचा कौल आहे. ही निवडणूक जाती-पातीवर नाही, तर विकासाच्या मुद्द्यावर झाली आहे.” विरोधकांवर टीका करताना त्यांनी सांगितले की, “ज्यांचा या निवडणुकीत खातेही उघडले नाही, ते जिंकण्यासाठी नव्हे तर इतरांना मदत करण्यासाठी उभे होते. आम्हाला संपवण्याचा विचार करणाऱ्या विरोधकांना जनतेनेच उत्तर दिलं आहे.” तसेच, “आमच्या सर्वेवर अनेकांनी टीका केली होती. मात्र सर्वे किती महत्त्वाचा असतो, हे या निवडणुकीतून सिद्ध झालं आहे. येत्या काळात आमचे नगरसेवक केवळ विकासाच्या मुद्द्यावर काम करतील. निधी कमी पडू देणार नाही,” असे आश्वासनही त्यांनी दिले.
पराभवानंतर मनोहर पोटे यांची प्रतिक्रिया “जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. शहराच्या विकासासाठी आम्ही यापूर्वीही कटिबद्ध होतो आणि पुढेही राहू. निवडणुकीत जय–पराजय होत असतात. निकाल स्वीकारून आम्ही पुन्हा जनतेच्या सेवेसाठी कामाला लागणार आहोत,” असे मनोहर पोटे यांनी सांगितले.
विजय उमेदवार खालीलप्रमाणे
नगराध्यक्षपदी भाजपाच्या सुनीता खेतमाळीस यांचा विजय
प्रभाग क्र. १
अ) पोटे पल्लवी पांडुरंग- शिवसेना
ब) खेडकर राजेंद्र दशरथ – भाजप
प्रभाग क्र. २
अ) खेतमाळी चांदणी दिलीप- भाजप
ब)शिंदे सुशीलकुमार गुलाब- शिवसेना
प्रभाग क्र. ३
अ)औटी अनिता दादा- शिवसेना
ब) शिंदे मच्छिंद्र दत्तात्रय- भाजप
प्रभाग क्र. ४
अ) घोडके वंदना संग्राम- भाजप
ब) औटी अनिल वसंत – शिवसेना
प्रभाग क्र. ५
अ) शेख अख्तर सिकंदर- शिवसेना
ब)बोरुडे दीपाली नंदकुमार- शिवसेना
प्रभाग क्र. ६
अ) घोडके सुनीता अनिल- भाजप
ब)गोरे सोनाली सागर-भाजप
प्रभाग क्र. ७
अ) काळे अश्विनी प्रवीण-भाजप
ब)अनभुले शुभांगी सुनील-भाजप
प्रभाग क्र. ८
अ) बोरुडे कोमल विकास-भाजप
ब)बोरुडे ऋषिकेश राजमल- शिवसेना
प्रभाग क्र. ९
अ) आनंदकर मनीषा विठ्ठल- भाजप
ब)खेतमाळीसशहाजी तुकाराम-भाजप
प्रभाग क्र. १०
अ) शिंदे मीरा नितीन-भाजप
ब)गोरे प्रशांत मिठू-भाजप
प्रभाग क्र. ११
अ) कोथिंबीरे भामाबाई रामभाऊ-शिवसेना
ब) धुमाळ श्रीकृष्ण बबन- शिवसेना
( गणेश कविटकर, श्रीगोंदा )
