श्रीगोंदा नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; २१ डिसेंबरला मतमोजणी…..

श्रीगोंदा (प्रतिनिधी):

श्रीगोंदा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतर्गत दिनांक ०२ डिसेंबर २०२५ रोजी पार पडलेल्या मतदानाची मतमोजणी रविवार, दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे. यासाठी सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण करण्यात आली असून मतमोजणी प्रक्रिया सकाळी १० वाजता सुरू होणार आहे.

श्रीगोंदा नगरपरिषदेच्या ११ प्रभागांची मतमोजणी एकाच वेळी होणार असून, शासकीय धान्य गोदाम, श्रीगोंदा येथे मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशासनाने मतमोजणी केंद्राची सर्व तयारी पूर्ण केली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मतमोजणीसाठी एकूण १२ टेबलांची व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक टेबलवर एक पर्यवेक्षक, एक सहाय्यक व एक शिपाई असे तीन कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच प्रभागनिहाय स्वतंत्र मतमोजणी केली जाणार आहे.

या निवडणुकीत एकूण ३ फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार असून नगरसेवक तसेच नगराध्यक्ष पदाची मतमोजणी एकाच वेळी केली जाणार आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत मतमोजणी पूर्ण होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

मतमोजणी प्रक्रियेदरम्यान प्रत्येक उमेदवारास त्यांच्या एका प्रतिनिधीस मतमोजणी कक्षात प्रवेशाची परवानगी देण्यात येणार आहे. शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक त्या सुरक्षाव्यवस्था करण्यात आल्या असून प्रशासन सतर्क असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.