श्रीगोंद्यात ध्वनीप्रदूषणाला ‘नो एन्ट्री’; डीजे, कर्णकर्कश बँड अन् बुलेटच्या आवाजावर पोलिसांचा ‘ॲक्शन प्लॅन’!

व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय; नियम मोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा पोलिसांचा इशारा, पोलिसांसाठी व्यापाऱ्यांकडून सीसीटीव्ही कॅमेरा देण्याचा निर्णय

श्रीगोंदा | दि. ०७ ऑगस्ट २०२६
गणेश कविटकर

शहरातील शांतता, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या आरोग्याला बाधा आणणाऱ्या ध्वनीप्रदूषणाविरोधात श्रीगोंदा पोलिसांनी आता कठोर भूमिका घेतली आहे. डीजेचा कर्णकर्कश दणदणाट, कानठळ्या बसविणारे बँड, रात्री उशिरापर्यंत होणारा फटाक्यांचा आवाज आणि सायलेन्सरमध्ये बदल करून धावणाऱ्या बुलेटचा कर्कश आवाज यांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून धडक कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.याच पार्श्वभूमीवर श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापारी असोसिएशनची विशेष बैठक घेण्यात आली.
शहरातील वाढत्या ध्वनीप्रदूषणाबाबत व्यापाऱ्यांनी चिंता व्यक्त करत विविध सूचना व मागण्यांचे निवेदन पोलिसांकडे सादर केले. व्यापाऱ्यांच्या सूचनांची गंभीर दखल घेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांकडून देण्यात आला.

डीजेवर बंदी, बँडच्या आवाजावर कारवाई….

सार्वजनिक कार्यक्रम आणि मिरवणुकांमध्ये कर्णकर्कश आवाजात डीजे वाजविण्यास परवानगी दिली जाणार नाही. ध्वनीमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या बँड चालकांवरही कारवाई केली जाणार आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि आजारी व्यक्तींना होणारा त्रास लक्षात घेऊन ध्वनीप्रदूषणाच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

रात्रीच्या फटाक्यांवरही पोलिसांची नजर…..

रात्रीच्या वेळी मोठ्या आवाजाचे फटाके फोडून शांतताभंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. शहरातील शांतता अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांनीही जबाबदारीने वागण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

‘मॉडिफाइड’ बुलेटचा आवाज आता महागात पडणार!….

शहरातील शाळा, महाविद्यालय परिसर तसेच मुख्य बाजारपेठेत सायलेन्सरमध्ये बदल करून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटवरही पोलिसांची विशेष नजर राहणार आहे. नियमबाह्य सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक तसेच आवश्यकतेनुसार फौजदारी कारवाई करण्यात येणार असून, असे सायलेन्सर जप्त करण्याची मोहीमही राबविण्यात येणार आहे.

पोलिसांच्या सुरक्षेसाठी व्यापाऱ्यांचा ‘एक कॅमेरा’ उपक्रम…..

शहरातील सुरक्षितता आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व्यापारी असोसिएशनने पोलिसांना सहकार्य करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. ‘एक कॅमेरा पोलिसांसाठी’ या उपक्रमांतर्गत व्यापाऱ्यांकडून पोलिसांना एक सीसीटीव्ही कॅमेरा उपलब्ध करून देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. शहरातील सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी व्यापाऱ्यांचा हा पुढाकार महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

‘शांत श्रीगोंडा’साठी पोलिसांसोबत व्यापारीही मैदानात….

शहरातील शांतता आणि सुव्यवस्था ही केवळ पोलिसांची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. व्यापारी बांधवांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असून, नागरिकांनीही ध्वनीप्रदूषणासंदर्भातील नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, श्रीगोंदा पोलीस स्टेशन यांच्या वतीने करण्यात आले आहे.
ध्वनीप्रदूषणाला आळा घालण्यासोबतच शहरातील सुरक्षितता अधिक मजबूत करण्यासाठी व्यापारी आणि पोलीस प्रशासन यांच्यातील हा समन्वय श्रीगोंद्यातील शांतता व सुव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.