लोकशाहीला नवा आदर्श देणारी व समाजाला दिशा दाखवणारी श्रीगोंद्याची घटना….
श्रीगोंदा ही धाकटी पंढरी म्हणून ओळखली जाते. संत, महात्मे आणि समाजप्रबोधनाच्या विचारांची सोज्वळ परंपरा लाभलेल्या या भूमीतून पुन्हा एकदा लोकशाहीचा खरा अर्थच नव्हे, तर समाजाला योग्य दिशा देणारी प्रेरणादायी घटना समोर आली आहे.
शिवसेना पक्षाचे प्रभाग क्रमांक १ मधील उमेदवार राजाभाऊ लोखंडे यांचा निवडणुकीत अवघ्या १ मताने पराभव झाला. हा पराभव कुणालाही आत्मपरीक्षण करायला लावणारा असला, तरी राजाभाऊ लोखंडे यांनी तो जिव्हारी न लावता, लोकशाहीच्या मूल्यांना साजेशी, संयमित व परिपक्व भूमिका घेतली जी आजच्या राजकारणात समाजासाठी मार्गदर्शक ठरणारी आहे.
पराभवानंतर त्यांनी थेट आपल्या प्रतिस्पर्धी आणि विजयी उमेदवार श्री. राजेंद्र खेडकर सर यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार व सन्मान केला. ही कृती केवळ राजकीय शिष्टाचारापुरती मर्यादित न राहता, विरोधातही माणुसकी, सौहार्द आणि संस्कार जपले जावेत, हा समाजाला संदेश देणारा प्रेरणादायी आदर्श ठरली आहे.
निवडणुकीतील विजय-पराभव तात्पुरते असतात; मात्र विचार, संस्कार आणि कृतीतून मिळणारा विजय कायमचा असतो, हे राजाभाऊ लोखंडे यांनी आपल्या कृतीतून ठळकपणे दाखवून दिले. त्यामुळे जरी निकालात पराभव आला असला, तरी लोकशाही मूल्य जपून, समाजाला सकारात्मक दिशा देत त्यांनी जनतेच्या मनात कृतीने विजय मिळवला, असेच म्हणावे लागेल.
या निमित्ताने “१ मत काय करू शकते” याची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. प्रत्येक मताचे महत्त्व, लोकशाहीतील जबाबदारी आणि निवडणुकीनंतरही सलोखा, संयम व सकारात्मकता टिकवण्याची गरज या घटनेतून स्पष्टपणे समोर येते जी समाजासाठी अत्यंत मोलाची शिकवण आहे.
श्री. राजेंद्र खेडकर सर यांचे विजयाबद्दल अभिनंदन करताना, राजाभाऊ लोखंडे यांच्या या उदात्त कृतीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. राज्यातील सर्वच उमेदवारांनी व राजकीय कार्यकर्त्यांनी हा आदर्श स्वीकारावा, आपण सर्व लोकशाहीचे घटक आहोत ही भावना अधिक बळकट करावी, अशी अपेक्षा सजग नागरिक व्यक्त करत आहेत.
श्रीगोंद्याच्या मातीतून उभा राहिलेला हा प्रसंग केवळ राजकीय घटना न राहता, समाजाला सुसंस्कृत राजकारणाची दिशा दाखवणारा लोकशाही संस्कृतीचा दीपस्तंभ ठरावा, अशीच सर्वांची भावना आहे.
( गणेश कविटकर, श्रीगोंदा )
