‘त्या’ दोन लेकींसाठी खासदार धावले

रात्रीच्या अंधारात बसची वाट पाहणाऱ्या दोन तरुणींना स्वतःच्या वाहनातून सुखरूप घरी पोहोचवत खासदार निलेश लंके यांनी जिंकली जनतेची मने

श्रीगोंदा |दि. ०६ जुलै २०२६

गणेश कविटकर

रात्र गडद होत चालली होती… बसस्थानकावर दोन तरुणी चिंताग्रस्त नजरेने येणाऱ्या प्रत्येक वाहनाकडे आशेने पाहत होत्या. घर गाठण्याची ओढ, सुरक्षिततेची चिंता आणि बस कधी येईल याची अनिश्चितता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. अशाच वेळी त्या दोन लेकींसाठी देवदूत ठरले खासदार निलेश लंके.

पिंपी कोलंदर चौफुला येथे रात्री उशिरापर्यंत एसटी बसची प्रतीक्षा करणाऱ्या त्या तरुणी खासदार लंके यांच्या नजरेस पडल्या. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता वाहन थांबवले, त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधला आणि अडचणीची विचारपूस केली.

“सायंकाळपासून बसची वाट पाहत आहोत, पण अजूनही बस आलेली नाही. आम्हाला शिरूरला जायचे आहे,” असे त्या तरुणींनी सांगितले. रात्रीची वाढती वेळ आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन खासदार लंके यांनी कोणताही गाजावाजा न करता त्यांना स्वतःच्या वाहनातून सुखरूप त्यांच्या घरी पोहोचवले.

आजच्या काळात अनेकजण समस्या पाहूनही दुर्लक्ष करतात. मात्र, संकटात सापडलेल्या दोन अनोळखी लेकींना मदतीचा हात देत खासदार लंके यांनी लोकप्रतिनिधीपदाचा खरा अर्थ कृतीतून दाखवून दिला. ही घटना केवळ मदतीची नसून, माणुसकी अजूनही जिवंत आहे, याचा विश्वास समाजाला देणारी ठरली.

या प्रसंगाने ग्रामीण भागातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील उणिवाही अधोरेखित केल्या आहेत. महिलांना रात्री उशिरापर्यंत बसस्थानकावर थांबण्याची वेळ येऊ नये, यासाठी ग्रामीण बससेवा अधिक सक्षम, नियमित आणि सुरक्षित करण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे.

एखाद्या व्यक्तीचे मोठेपण त्याच्या पदात नसते, तर त्याच्या संवेदनशीलतेत असते. संकटात असलेल्या दोन लेकींना सुरक्षितपणे घरी पोहोचवत खासदार निलेश लंके यांनी माणुसकी, कर्तव्य आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा असा आदर्श घालून दिला, जो प्रत्येक लोकप्रतिनिधी आणि नागरिकासाठी प्रेरणादायी ठरेल.

“सत्तेपेक्षा संवेदनशीलता मोठी… आणि पदापेक्षा माणुसकी श्रेष्ठ!”

याची प्रचिती देणारी ही घटना श्रीगोंदा तालुक्यासाठी अभिमानाची ठरली आहे.