महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या सुरेखा मातनेची विभागीय क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी निवड
श्रीगोंदा | दि. ०१ ऑगस्ट २०२६
गणेश कविटकर
जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर मैदानी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या लाँग डिस्टन्स रनर सुरेखा मातने हिने पुन्हा एकदा आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवली आहे. शेवगाव येथे झालेल्या आंतरमहाविद्यालयीन क्रॉसकंट्री स्पर्धेत चमकदार कामगिरी करत तिची नाशिक येथे होणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागीय क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सुरेखाने यापूर्वीही विविध हाफ मॅरेथॉन स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आपल्या धावण्याच्या कौशल्याची झलक दाखवली आहे. तसेच अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रॉसकंट्री स्पर्धेतही तिने प्रभावी कामगिरी केली आहे. ग्रामीण भागातून पुढे येत क्रीडा क्षेत्रात सातत्याने नवे शिखर गाठणाऱ्या सुरेखाच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
तिच्या या यशाबद्दल महाविद्यालयीन विकास समितीचे चेअरमन तथा माजी मंत्री बबनराव पाचपुते, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य बाबासाहेब भोस, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य राहुलदादा जगताप, महावीर पटवा, प्राचार्य प्रो. डॉ. प्रकाश साळवे, उपप्राचार्य डॉ. सुदाम भुजबळ, डॉ. नितीन थोरात, प्रा. श्रीकांत थोरात, पर्यवेक्षक प्रा. रत्नाकर झिटे यांच्यासह सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सुरेखाचे अभिनंदन केले.
सुरेखाला शारीरिक शिक्षण संचालक प्रा. कल्पना बागुल आणि क्रीडा शिक्षक संजय डफळ यांचे मार्गदर्शन लाभले. तिची ही निवड ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ‘मेहनत आणि जिद्द असेल तर संधीचे आकाशही छोटे पडते’, असा प्रेरणादायी संदेश देणारी ठरली आहे.
