पानिपत वीरांच्या स्मृती जतन करण्यासाठी शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनचे तहसीलदारांना निवेदन; शिंदेशाही वारसा संग्रहालयाचीही मागणी
श्रीगोंदा | दि. २९ सप्टेंबर २०२६
गणेश कविटकर
पानिपतच्या रणभूमीवर शौर्याची गाथा लिहिणाऱ्या असंख्य वीरांचा ऐतिहासिक वारसा श्रीगोंदा शहराच्या मातीत आजही जिवंत आहे. मात्र, काळाच्या ओघात या ऐतिहासिक वास्तू व स्मृतिस्थळांकडे झालेले दुर्लक्ष चिंताजनक असून, महादजी शिंदे राजवाड्यासह श्रीगोंदा शहरातील पानिपत वीरांशी संबंधित सर्व ऐतिहासिक स्थळांना वारसा स्मारकाचा दर्जा देऊन त्यांचे संवर्धन करावे, अशी मागणी शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत संस्थेच्या वतीने तहसीलदार सचिन डोंगरे तसेच भूमी अभिलेख कार्यालयाला निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व व पर्यटन विभागाकडेही या ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे संस्थेने सांगितले.
श्रीगोंदा शहरातील दिल्ली वेस, पानिपत शौर्य वेस, महादजी शिंदे राजवाडा, पूर्व वेस, मैनाबाई माळावरील छत्री समाधी, महादजी शिंदे पादुका स्मारक, विविध बारवा तसेच पानिपत वीरांशी संबंधित ऐतिहासिक पाऊलखुणा पुढील पिढ्यांसाठी जतन करण्याची गरज आहे. या स्मृतिस्थळांचे पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून शास्त्रोक्त पद्धतीने संवर्धन करून अधिकृत वारसा स्मारक म्हणून नोंद व्हावी, यासाठी आवश्यक प्रशासकीय कार्यवाही व कागदपत्रांची पूर्तता स्थानिक प्रशासनाने करावी, अशी मागणी करण्यात आली.
पुरातत्त्व विभागाच्या सहाय्यक संचालक, नाशिक यांच्याकडे यापूर्वीही पाठपुरावा करण्यात आला आहे. पर्यटन व पुरातत्त्व विभागाने मागील निवेदनांची दखल घेत तहसीलदारांमार्फत श्रीगोंदा शहरातील पानिपत वारसा स्थळांची माहिती मागवली आहे. त्यानुसार या ऐतिहासिक वास्तूंची अद्ययावत भूराजस्व माहिती प्राधान्याने पाठवून पुढील कार्यवाहीस सहकार्य करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.
शिंदेशाही वारसा संग्रहालयाची मागणी
श्रीगोंदा शहरात पानिपत वीरांच्या स्मृतींना उजाळा देणारे भव्य स्मारक, शिंदेशाही घराण्याच्या इतिहासाची माहिती देणारे पुरातन वास्तू संग्रहालय तसेच शहरातील दर्शनी चौकात राणोजी शिंदे, दत्ताजी शिंदे, जयप्पा शिंदे, जनकोजी शिंदे व महादजी शिंदे यांच्या पराक्रमाचे चित्रशिल्प उभारण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
“श्रीगोंदेकरांच्या जनभावनेचा विचार करून या ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी प्रशासनाने प्राधान्याने पावले उचलावीत. पानिपत वीरांचा इतिहास केवळ पुस्तकांत न राहता तो पुढील पिढीला प्रत्यक्ष अनुभवता यावा, यासाठी वारसा स्थळांचे संवर्धन होणे आवश्यक आहे,” असे शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश इंगळे यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजेश इंगळे, कायदेशीर सल्लागार अॅड. गोरख कडूस, वारसा संवर्धन समितीचे उपाध्यक्ष सचिन भोसले, अमोल बडे आदी उपस्थित होते.
