धर्मवीर गडाच्या वैभवाला आता ५ कोटींचे बळ

पेडगावातील छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी निधी मंजूर; विखे-पाचपुते यांच्या पाठपुराव्याला यश

 

श्रीगोंदा | दि. ०१ सप्टेंबर २०२६

गणेश कविटकर

 

श्रीगोंदा तालुक्याच्या ऐतिहासिक वैभवाचा मानबिंदू असलेल्या पेडगावच्या धर्मवीर गडाच्या विकासाला अखेर मोठी चालना मिळाली आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यासह गडाच्या जतन, संवर्धन व दुरुस्तीच्या कामांसाठी महाराष्ट्र शासनाने तब्बल ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाने या कामास प्रशासकीय मान्यता दिल्याने धर्मवीर गडाच्या विकासाचा मार्ग आता प्रत्यक्षात मोकळा झाला आहे.

धर्मवीर गडाचे ऐतिहासिक महत्त्व जपत त्याचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील आणि श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, ५ कोटींच्या निधीमुळे गडाच्या विकासाला मोठा आर्थिक आधार मिळाला आहे.

सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाने १२ ऑगस्ट २०२६ रोजी जारी केलेल्या कार्यालयीन आदेशानुसार प्राचीन स्मारकांच्या जतन व दुरुस्तीच्या उपलब्ध निधीतून धर्मवीर गडाच्या कामाचा समावेश करण्यात आला आहे. या कामास प्रशासकीय मान्यता मिळाली असून, पुढील टप्प्यात निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष विकासकामांना सुरुवात होणार आहे.

पेडगावचा धर्मवीर गड हा छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य, स्वाभिमान आणि बलिदानाच्या इतिहासाशी जोडलेली पवित्र ऐतिहासिक भूमी आहे. संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे पकडल्यानंतर पेडगाव परिसरात आणण्यात आल्याचा इतिहास या गडाशी जोडला जातो. त्यामुळे या ऐतिहासिक स्थळाचे संवर्धन केवळ वास्तूचे जतन नसून छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि बलिदानाची स्मृती जपण्याचे कार्य ठरणार आहे.

मंजूर निधीतून गडावरील प्राचीन वास्तूंची जतन-दुरुस्ती, तटबंदीचे संवर्धन, परिसराचे सुशोभीकरण तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतींना साजेसे स्मारक उभारण्याची कामे प्रस्तावित आहेत. या विकासामुळे धर्मवीर गडाला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यटनाच्या नकाशावर नवी ओळख मिळण्याची अपेक्षा आहे.

५ कोटींच्या निधीमुळे केवळ गडाच्या दगड-मातीचे संवर्धन होणार नसून, छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची गाथा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या ऐतिहासिक ठेव्याला नवसंजीवनी मिळणार आहे.