पावनखिंड शौर्याच्या पाऊलखुणांवर शिवदुर्गच्या मावळ्यांची अभिमानास्पद मानवंदना

पन्हाळा ते पावनखिंड ५२ किमी अमृतमहोत्सवी मोहिमेत ९१ शिवप्रेमींचा सहभाग; स्वराज्याच्या इतिहासाला कृतिशील सलाम….

 

श्रीगोंदा | दि. 20 जुलै 2026

गणेश कविटकर

 

स्वराज्याच्या इतिहासातील पराक्रम, त्याग आणि निष्ठेची साक्ष देणाऱ्या पन्हाळा ते पावनखिंड या पावन वाटेवर पुन्हा एकदा “जय भवानी… जय शिवराय!”चा बुलंद जयघोष दुमदुमला. नरवीर बाजीप्रभू देशपांडे, वीर शिवा काशिद आणि बांदल सेनेच्या ३०० मावळ्यांच्या अद्वितीय बलिदानाला अभिवादन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ७५व्या अमृतमहोत्सवी पन्हाळा–पावनखिंड मोहिमेत राज्यभरातील सुमारे ७५० शिवभक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत इतिहासाला कृतिशील मानवंदना अर्पण केली.

कोल्हापूर येथील हिल रायडर्स फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही ऐतिहासिक ५२ किलोमीटरची पदभ्रमंती केवळ एक ट्रेक नव्हती, तर स्वराज्याच्या शौर्यगाथेचा जिवंत अनुभव देणारी प्रेरणायात्रा ठरली. “लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे” या स्वराज्यनिष्ठ विचाराचा प्रत्यय प्रत्येक पावलागणिक सहभागी शिवप्रेमींना येत होता.

मोहिमेची सुरुवात ऐतिहासिक पन्हाळगडावरील वीर शिवा काशिद आणि नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून झाली. यावेळी हिल रायडर्सचे अध्यक्ष प्रमोद पाटील, रायबा राहुल नलावडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते शौर्यस्थळाला अभिवादन करण्यात आले.

विशेष म्हणजे, शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशनने सलग पाचव्या वर्षी या ऐतिहासिक मोहिमेत सहभाग नोंदवून आपल्या शिवभक्तीची परंपरा कायम राखली. या उल्लेखनीय योगदानाबद्दल संस्थेचा विशेष सन्मान करण्यात आला. संस्थेच्या वतीने रायगड-पनवेलचे तहसीलदार जितेंद्र इंगळे आणि शिवदुर्गच्या शिलेदारांनी हा सन्मान स्वीकारला.

शिवदुर्गचे मावळे प्रणव गलांडे यांच्या जोशपूर्ण शिवगर्जनेने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. त्यांच्या गर्जनेने प्रत्येक सहभागीच्या अंगात वीरश्री संचारली आणि स्वराज्याच्या इतिहासाशी भावनिक नाळ अधिक दृढ झाली.

यंदाच्या मोहिमेत शिवदुर्गच्या तब्बल ९१ सदस्यांनी सहभाग घेतला. विशेष आकर्षण ठरलेले बालमावळे आदित्य खोमणे आणि राजवीर रोकडे यांनी अल्पवयातच ५२ किलोमीटरची पदभ्रमंती यशस्वीरीत्या पूर्ण करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या धाडसाचा विशेष सन्मान करण्यात आला. मोहिमेदरम्यान वैद्यकीय सेवेसाठी डॉ. संजय वाघमोरे यांनी निःस्वार्थपणे मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देत सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले.

 

सलग पाच वर्षांची पावनखिंड वारी; इतिहासाशी जपलेली नाळ –

शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश इंगळे आणि संगीता इंगळे यांनी २०२२ ते २०२६ या सलग पाच वर्षांत जोडीने पन्हाळा–पावनखिंड वारी पूर्ण करून शिवभक्तांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. “महाराष्ट्रात जन्म घेऊन पावनखिंडीची वारी केली नाही, तर इतिहासाशी असलेले आपले ऋण पूर्ण होत नाही,” या भावनेतून ते दरवर्षी शेकडो युवक-युवतींना या ऐतिहासिक मोहिमेत सहभागी करून स्वराज्याचा इतिहास प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी देत आहेत.

या पाचव्या वर्षी अध्यक्ष राजेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिम प्रमुख अक्षय ओहळ आणि त्यांच्या शिलेदार टीमने उत्कृष्ट नियोजन केले. “चांडाळ चौकडी फेम” रामभाऊ जगताप, डॉ. संदीप पाटील, डॉ. संजय वाघमोरे, संगीता इंगळे, प्रा. भरत खोमणे, डॉ. अर्चना वाघमोरे, डॉ. वंदना पाटील, अमोल बडे, तुषार चौधरी, प्रणव गलांडे, चेतन चौधरी, सुहास गाडेकर, प्रा. प्रमोद परदेशी, प्रा. विजय इथापे, प्रा. अमर भोसले, शंकर जाधव, औदुंबर शिंदे यांच्यासह ९१ शिलेदारांनी या ऐतिहासिक मोहिमेत उत्साहाने सहभाग नोंदवला.

पन्हाळा ते पावनखिंड हा प्रवास केवळ ५२ किलोमीटरचा नाही, तर स्वराज्याच्या अस्मितेचा, त्यागाचा, पराक्रमाचा आणि राष्ट्रभक्तीचा अखंड जागर आहे. अशा मोहिमा नव्या पिढीला इतिहासाशी जोडत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची प्रेरणा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचे मोलाचे कार्य करत आहेत.