कुकडी पाटबंधारे विभागाविरोधात शेतकऱ्यांचा संताप; पाच दिवसांत रोटेशन सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा निर्धार
श्रीगोंदा | दि. 20 जुलै 2026
गणेश कविटकर
कुकडी पाटबंधारे विभागाकडून विसापूर कॅनॉल लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळत नसल्याचा आरोप करत शेतकरी कृती बचाव समितीने प्रशासनाला अंतिम इशारा दिला आहे. निवेदन दिल्यानंतर पाच दिवसांच्या आत कॅनॉलचे रोटेशन सुरू झाले नाही, तर रविवार, २६ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विसापूर धरणात जलसमाधी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा समितीने दिला आहे.
यासंदर्भात समितीच्या वतीने कुकडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, श्रीगोंदा यांना लेखी निवेदन देण्यात आले असून, त्याच्या प्रती पालकमंत्री, स्थानिक आमदार, तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षक यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.
समितीच्या निवेदनानुसार, यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे विसापूर कॅनॉल परिसरातील खरीप पिके, फळबागा, जनावरांचा चारा आणि दुग्धव्यवसाय गंभीर संकटात सापडला आहे. धरणात सुमारे ८० टक्के पाणीसाठा उपलब्ध असतानाही अद्याप कॅनॉलचे एकही रोटेशन देण्यात आलेले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
शेतकरी कृती बचाव समितीने प्रशासनावर गंभीर आरोप करत शासनाच्या नियमांचा चुकीचा अर्थ लावून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी नाकारले जात असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे हजारो शेतकरी आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर उभे असून, तातडीने पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
समितीने दिलेल्या इशाऱ्यानुसार, प्रशासनाने वेळेत निर्णय घेतला नाही, तर २६ जुलै रोजी हजारो शेतकरी विसापूर धरण परिसरात एकत्र येऊन जलसमाधी आंदोलन करतील. आंदोलनादरम्यान उद्भवणाऱ्या कोणत्याही कायदा-सुव्यवस्थेच्या किंवा इतर परिणामांची जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शेतकरी कृती बचाव समितीचे अध्यक्ष राजेंद्र झुंबर काकडे यांनी सांगितले की, “हा लढा कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा व्यक्तीचा नसून विसापूर कॅनॉल लाभक्षेत्रातील हजारो शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी आहे. धरणात पुरेसा पाणीसाठा असतानाही रोटेशन न देणे हा शेतकऱ्यांवरील अन्याय आहे. प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा २६ जुलैच्या जलसमाधी आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल. ‘ना नेता… ना पुढारी… फक्त शेतकऱ्यांसाठी दुनियादारी’ हेच आमचे ब्रीद आहे.”
समितीचे ॲड. ऋषिकेश झुंबरराव गायकवाड यांनीही प्रशासनाला इशारा देताना सांगितले की, “शासनाचे नियम शेतकऱ्यांच्या हितासाठी आहेत. त्यांचा गैरअर्थ लावून शेतकऱ्यांना हक्काचे पाणी नाकारणे योग्य नाही. आम्ही प्रशासनाला पुरेसा वेळ दिला आहे. तरीही रोटेशन सुरू झाले नाही, तर २६ जुलैचे जलसमाधी आंदोलन हे शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी असेल. आमचा संघर्ष शांततामय आहे; मात्र शेतकऱ्यांच्या न्यायासाठी तो शेवटपर्यंत सुरू राहील.”
या आंदोलनाचे नेतृत्व ॲड. ऋषिकेश झुंबरराव गायकवाड आणि राजेंद्र झुंबर काकडे करणार असून, विसापूर कॅनॉल लाभक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शेतकरी कृती बचाव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
