स्पर्धा परीक्षेच्या स्वप्नांना बळ; सिद्ध पिंपरीतील अभ्यासिकेला स्पर्धा परीक्षा पुस्तकांची अनमोल भेट

नाशिक | दि. २० जुलै २०२६

 

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची दर्जेदार तयारी करता यावी, त्यांच्या ज्ञानाचा पाया अधिक भक्कम व्हावा आणि गुणवत्तेच्या बळावर त्यांनी यशाची शिखरे गाठावीत, या उदात्त हेतूने कै. पुंजाजी ढिकले पाटील प्रतिष्ठान यांच्या वतीने सिद्ध पिंपरी येथील स्व. कमल उत्तमराव ढिकले अभ्यासिकेला यूपीएससी व एमपीएससी स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेल्या विविध संदर्भातील अनेक पुस्तके प्रदान करण्यात आला.ही पुस्तके सहाय्यक पोलीस आयुक्त, चेंबूर, मुंबई श्री. रामराव ढिकले यांच्या वतीने अभ्यासिकेकडे सुपूर्द करण्यात आली.

यावेळी बोलताना श्री. ढिकले यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक असणारी आणखी पुस्तके भविष्यातही उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त केला. त्यांच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवक-युवतींना मोठा आधार मिळणार असून, त्यांच्या यशाचा मार्ग अधिक सुकर होणार आहे.

श्री. रामराव ढिकले यांनी पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये विविध ठिकाणी कार्यरत असताना स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळाली असून, स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करण्यासाठी त्यांना मोठे बळ मिळाले.

यावेळी अभ्यासिकेसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि सीसीटीव्ही यंत्रणेची गरज उपस्थित करण्यात आली. या मागणीची तातडीने दखल घेत योगेश कृषी सेवाचे संचालक यांनी अभ्यासिकेसाठी सीसीटीव्ही प्रणाली लवकरच उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.तर ग्रामपंचायत यांनी वॉटर प्युरिफायर बसवणार असल्याचे सांगितले. त्यांच्या या सकारात्मक भूमिकेमुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि सुविधायुक्त अभ्यासाचे वातावरण उपलब्ध होणार आहे.

कार्यक्रमादरम्यान स्थानिक संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या वतीने श्री. रामराव ढिकले यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कै. पुंजाजी ढिकले पाटील प्रतिष्ठान हे सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असून, समाजहिताची जपणूक, गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि संस्कारक्षम पिढी घडविण्याच्या ध्येयाने सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. समाजसेवेचा वसा जपत सर्वसामान्यांच्या विकासासाठी समर्पित भावनेने कार्य करणारे हे प्रतिष्ठान आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला योग्य दिशा देण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती व संस्थांनी केलेले असे शैक्षणिक योगदान केवळ पुस्तकांचे वाटप नसून, ते असंख्य तरुणांच्या उज्ज्वल भविष्यातील गुंतवणूक आहे. अशा प्रेरणादायी उपक्रमांमुळे ज्ञान, शिक्षण आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श समाजासमोर उभा राहत आहे.