खोदलेल्या रस्त्याने घेतले दोन सरकारी कर्मचाऱ्यांचे प्राण; श्रीगोंदा तहसीलवर शोककळा

श्रीगोंदा | १९ जुलै २०२६

 

श्रीगोंद्याकडे येत असताना झालेल्या भीषण अपघातात दोन सरकारी कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना पाटोदा (ता. जामखेड) परिसरात घडली. या घटनेने श्रीगोंदा तहसील कार्यालयासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, खोदलेल्या रस्त्यांवरील अपुऱ्या सुरक्षेच्या उपाययोजनांमुळे आणखी किती निष्पाप जीव जाणार, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीगोंदा तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार विभागात कार्यरत विकील बहुरे आणि कुकडी पाटबंधारे विभागातील कर्मचारी रामचंद्र बहुरे हे दोघे जामखेडकडून श्रीगोंद्याकडे येत होते. पहाटेच्या सुमारास पाटोदा परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे खोदलेला भाग आणि अपुरी सुरक्षा व्यवस्था यामुळे समोरून आलेल्या वाहनाला चुकवण्याचा प्रयत्न करताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर वाहन थेट खोदलेल्या खड्ड्यात जाऊन आदळले. अपघात इतका भीषण होता की दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

विकील बहुरे हे श्रीगोंदा तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार विभागात अत्यंत प्रामाणिक, शांत स्वभावाचे आणि कर्तव्यदक्ष कर्मचारी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अकाली निधनाने तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे. तसेच रामचंद्र बहुरे यांच्या निधनाने कुकडी पाटबंधारे विभागालाही मोठा धक्का बसला आहे.

या घटनेनंतर रस्त्यावरील सुरू असलेल्या कामांदरम्यान आवश्यक इशारे, बॅरिकेड्स, परावर्तक फलक आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना पुरेशा होत्या का, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. नागरिकांनी या अपघाताची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची तसेच रस्ते कामांमध्ये सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याची मागणी केली आहे.

दोन कर्तव्यदक्ष सरकारी कर्मचाऱ्यांचा हा दुर्दैवी मृत्यू केवळ एका कुटुंबाचे नव्हे, तर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेचे मोठे नुकसान असून, रस्ते सुरक्षेबाबत तातडीने उपाययोजना करण्याची गरज या घटनेने अधोरेखित केली आहे.