भागवत धर्माचा निष्ठावंत वारकरी, संगीतसेवेचा अखंड दीप मालवला
अहिल्यानगर : अहिल्यानगर तालुक्यातील वाळकी गावचे ज्येष्ठ नागरिक, प्रगतीशील शेतकरी आणि भागवत धर्माचे निष्ठावंत प्रसारक जगन्नाथ दगडुजी बोठे पाटील (वय ९०) यांचे शनिवारी (ता. २३) वृद्धापकाळाने त्यांच्या राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने वाळकी परिसरासह संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली असून, वारकरी संप्रदाय आणि संगीत क्षेत्राने एक अभ्यासू, सेवाभावी व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व गमावले आहे.
“जगन्नाथतात्या” या नावाने पंचक्रोशीत परिचित असलेल्या बोठे पाटील यांनी आयुष्यभर समाजप्रबोधन, संगीतसेवा आणि अध्यात्माचा वसा जपला. साधेपणा, मनमिळावूपणा आणि सेवाभावी वृत्तीमुळे त्यांनी समाजात एक वेगळे आदराचे स्थान निर्माण केले होते.
सन १९६६ च्या सुमारास त्यांनी “संगीत विशारद” ही संगीत क्षेत्रातील मानाची पदवी संपादन केली होती. त्या काळात वाळकी परिसरात संगीताचे शिक्षण घेऊन ही पदवी मिळवणारे ते एकमेव व्यक्तिमत्त्व होते. संगीतकलेचा प्रचार आणि प्रसार व्हावा या ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी गेली पन्नास वर्षे पंचक्रोशीतील असंख्य हौशी तरुणांना टाळ, हार्मोनियम, तबला, पायपेटी, मृदंग व भजनकलेचे मोफत प्रशिक्षण दिले. त्यांच्या या अथक कार्यामुळे अनेक युवकांना संगीत आणि अध्यात्माची दिशा मिळाली.
संगीत क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत सन २०१४ मध्ये पुणे येथील शनिवारवाडा पटांगणात आयोजित नवव्या अखिल भारतीय वारकरी संगीत संमेलनात त्यांना “वारकरी संगीत भूषण” या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते. हा सन्मान त्यांच्या आयुष्यभराच्या निस्वार्थ संगीतसेवेचा गौरव मानला जातो.
शेती क्षेत्रातही त्यांनी विविध प्रयोग राबवत प्रगतीशील शेतकरी म्हणून आपला वेगळा ठसा उमटवला. शेतीसोबतच अध्यात्माकडे असलेला त्यांचा ओढा अखेरपर्यंत कायम राहिला. भागवत धर्माचा प्रचार आणि वारकरी संप्रदायाची शिकवण जनमानसात पोहोचवण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले.
राजकारणापासून जाणीवपूर्वक दूर राहून समाजसेवा आणि अध्यात्माची वाट त्यांनी निवडली. त्यांच्या सहवासातून अनेकांना संस्कार, प्रेरणा आणि जीवनमूल्यांची शिकवण मिळाली.
शनिवारी (ता. २३) वाळकी येथील त्यांच्या शेतात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते महाराष्ट्रातील वरिष्ठ पत्रकार ॲड. डॉ. बाळासाहेब बोठे पाटील, यशदीप गॅस एजन्सीचे संचालक प्रा. अनुपम बोठे पाटील आणि वीरपत्नी इंद्रायणी भालसिंग यांचे वडील होत.
त्यांच्या निधनाने वाळकी परिसरातील अध्यात्म, वारकरी परंपरा आणि संगीतसेवेचा एक अखंड दीप मालवला असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
