श्रीगोंदा | दि. 27 मे 2026
गणेश कविटकर
मांडवगण-श्रीगोंदा मार्गाच्या रस्ता रुंदीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू असताना, परिसरातील ऐतिहासिक व पुरातन “काशीबारव” सुरक्षित ठेवण्यात यश आले आहे. वारसा संवर्धनासाठी गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या जनजागृती, पाठपुरावा आणि संघर्षाला अखेर यश मिळाल्याने इतिहासप्रेमींमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
काशीबारव परिसरात पुन्हा रस्ता खोदकाम सुरू झाल्यानंतर बारवेला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून बारवेला कोणताही धक्का न लावता रस्त्याचे काम करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. ही माहिती शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश इंगळे यांना अधिकाऱ्यांनी भेटीदरम्यान दिली.
महाराष्ट्र बारव मोहिमेअंतर्गत समाजमाध्यमे, प्रिंट मीडिया आणि विविध स्तरांवर मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली होती. काशीबारव आणि परिसरातील चिंचेची झाडे वाचविण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांनीही सातत्याने संघर्ष केला. अखेर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याने बारवेसह झाडेदेखील सुरक्षित राहणार आहेत.
पुरातन काशीबारव वाचविण्यासाठी शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन, शिवदुर्ग वारसा संवर्धन समिती आणि महाराष्ट्र बारव मोहिमेच्या माध्यमातून विविध शासकीय कार्यालयांशी सातत्याने पत्रव्यवहार करण्यात आला होता. आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या माध्यमातूनही या विषयाचा पाठपुरावा करण्यात आला. बारवेचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करत वारसा संवर्धनाची भूमिका ठामपणे मांडण्यात आली होती.
रस्त्याचे काम करणारे अधिकारी आणि ठेकेदार यांनी स्थळदर्शक पाहणी करून शिलालेखांची तपासणी केली. तसेच, भविष्यात अपघात टाळण्यासाठी बारवेच्या कडेला संरक्षक कठडा उभारण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
महादजी शिंदे घराण्याच्या ऐतिहासिक वारशाचा महत्त्वपूर्ण भाग असलेल्या काशीबारवचे संरक्षण झाल्याने श्रीगोंदा तालुक्यातील इतिहासप्रेमी, वारसा संवर्धक आणि शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनच्या सदस्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
या कार्यासाठी सहकार्य करणारे आमदार विक्रमसिंह पाचपुते, अहिल्यानगर जिल्हाधिकारी, श्रीगोंदा तहसीलदार, पुरातत्व विभाग, बांधकाम विभाग, संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांचे वारसा संवर्धकांच्या वतीने आभार मानण्यात आले आहेत.
