३१ मार्च २०२६ पर्यंत संधी; मालमत्ता कर थकबाकीदारांनी लाभ घ्यावा
श्रीगोंदा | दि. १९ मार्च २०२६
गणेश कविटकर
श्रीगोंदा : श्रीगोंदा नगरपरिषद हद्दीतील मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी नगरपरिषदेकडून अभय योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत थकित मालमत्ता कराच्या रकमेवरील दंड व शास्तीमध्ये १०० टक्के सूट देण्यात येणार असल्याची माहिती नगरपरिषदेकडून देण्यात आली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी विहित नमुन्यात अर्ज करून ३१ मार्च २०२६ पर्यंत नगरपरिषद कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. अर्जाचा नमुना नगरपरिषद कार्यालयात उपलब्ध असून, नागरिकांच्या सोयीसाठी ३१ मार्चपर्यंत सुट्टीच्या दिवशीही कार्यालय सुरू ठेवण्यात येणार आहे. तसेच कार्यालयीन वेळ सकाळी ९.०० ते सायंकाळी ६.३० अशी वाढविण्यात आली आहे.
नागरिकांना त्यांच्या मालमत्ता कर थकबाकीची माहिती घरबसल्या पाहता यावी यासाठी “महायुएलबी” पोर्टलवर ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये मालमत्ता क्रमांक टाकून थकबाकी, सवलत व देय रक्कम याची माहिती सहज मिळू शकते.
अटी व शर्तीनुसार, थकबाकीची संपूर्ण रक्कम एकरकमी भरल्यानंतरच अभय योजनेचा लाभ मिळणार आहे. ही योजना एकदाच लागू असून, ३१ मार्च २०२६ नंतर ती लागू राहणार नाही. तसेच चालू वर्षाच्या दंडावर कोणतीही सूट मिळणार नाही. योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रथम पाणीपट्टीचा भरणा करणे आवश्यक आहे.
नगरपरिषदेकडून प्रथमच अशी योजना राबविण्यात येत असून, ही एकदाच उपलब्ध होणारी संधी असल्याने सर्व थकबाकीदारांनी याचा लाभ घ्यावा आणि नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
