धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान सप्ताहानिमित्त प्रेरणादायी उपक्रमांची मालिका

पेडगाव (ता. श्रीगोंदा) | दि. १७ मार्च २०२६

गणेश कविटकर

 

हिंदवी स्वराज्याचे शूर, धर्मरक्षक आणि अद्वितीय पराक्रमाचे प्रतीक असलेले छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृती जागवण्यासाठी पेढगाव येथे ‘बलिदान सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले आहे. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान सप्ताह समितीच्या वतीने १७ ते १८ मार्च २०२६ दरम्यान विविध धार्मिक, सामाजिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, या उपक्रमातून युवकांमध्ये राष्ट्रप्रेम, संस्कार आणि समाजसेवेची जाणीव दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

मंगळवार, दि. १७ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता श्री धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या पादुका पूजन व वृक्षारोपण कार्यक्रमाने सप्ताहाची सुरुवात होणार आहे. दुपारी २ ते ५ या वेळेत युवा कीर्तनकार ह.भ.प. उद्धव महाराज पवार यांचे कीर्तन होणार असून, त्यांच्या प्रभावी वाणीमधून धर्म, संस्कार आणि राष्ट्रभक्तीचा संदेश दिला जाणार आहे. सायंकाळी ६.०० वाजता बलिदान भूमीवर पुष्प अर्पण करून महान बलिदानाला अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६.३० ते ९.३० या वेळेत समाज प्रबोधनकार युवा व्याख्याते ह.भ.प. सोपान दादा कनेरकर यांचे व्याख्यान होणार असून, युवकांना इतिहासातून प्रेरणा घेण्याचे मार्गदर्शन केले जाणार आहे.

बुधवार, १८ मार्च रोजी पोवाडा, “मी शिवछत्रपती बोलतोय” या एकपात्री नाटकाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याचा इतिहास जिवंत केला जाणार आहे. याचबरोबर व्याख्यानांच्या माध्यमातून युवकांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न होणार असून, दोन्ही दिवशी आयोजित रक्तदान शिबिरातून समाजसेवेचा प्रभावी संदेश दिला जाणार आहे.

या संपूर्ण बलिदान सप्ताहाची संकल्पना गुरुवर्य सद्गुरु श्री. मनोहर (मामा) भोसले यांची असून, त्यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनातून हा उपक्रम साकारला जात आहे.

कार्यक्रमासाठी ह.भ.प. नितीन महाराज सवडकर यांचे मार्गदर्शन लाभणार असून, मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. धर्मवीर संभाजी महाराजांचे बलिदान हे प्रत्येकासाठी प्रेरणादायी असून, त्यांच्या त्यागातून राष्ट्रभक्ती, धर्मनिष्ठा आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द घेण्याचा संदेश या सप्ताहातून दिला जात आहे.