शिवदुर्गची ऐतिहासिक शंभरी — शिवनेरीवर दुमदुमला शिवविचाराचा जयघोष….

शिवाई देवीच्या साक्षीने १०० वी मोहिम अर्पण; ११३ शिवप्रेमींची प्रेरणादायी उपस्थिती

श्रीगोंदा | दि. १७ मार्च २०२६

गणेश कविटकर

जुन्नरच्या पवित्र भूमीत वसलेल्या किल्ले शिवनेरी या शिवजन्मभूमीवर रविवारी इतिहासाचा एक अभिमानास्पद क्षण साकार झाला. शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनने आपल्या ट्रेकिंग प्रवासातील १०० वी मोहिम यशस्वीरित्या पूर्ण करत ट्रेकिंग विश्वात शतकिय उंची गाठली. या ऐतिहासिक मोहिमेत तब्बल ११३ शिवप्रेमी सदस्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश इंगळे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली सुरू झालेला हा प्रवास किल्ले धर्मवीरगड येथून प्रारंभ होऊन थेट शिवनेरीपर्यंत अखंड परिक्रमा करत आज एका सुवर्ण टप्प्यावर पोहोचला आहे. २०१८ ते २०२६ या नऊ वर्षांच्या कालावधीत शिवदुर्ग परिवाराने तब्बल १०० गडकोटांची अभ्यासपूर्ण भटकंती करत वारसा संवर्धनाच्या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

सह्याद्रीच्या कातळकड्यांतून चालताना प्रत्येक गडावर उभा राहणारा शिवकालीन इतिहास, प्रत्येक ऋतूत बदलणारे निसर्गरूप आणि प्रत्येक पावलागणिक जाणवणारा स्वाभिमान या सर्वांचा अनुभव शिवदुर्ग परिवाराने जपला आहे. गडकिल्ले हे केवळ दगड-मातीचे बांधकाम नसून ते आपल्या संस्कृतीचे, परंपरेचे आणि स्वाभिमानाचे जिवंत प्रतीक आहेत, ही जाणीव प्रत्येक मोहिमेतून दृढ केली गेली.

अनेक अडथळे, संघर्ष आणि आव्हानांवर मात करत शिवदुर्गने तरुणाईसमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी विचारांचा दीपस्तंभ उभा केला. स्वयंशिस्त, आचारसंहिता आणि ठाम नेतृत्वाच्या बळावर तेरा जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या या संस्थेने हजारो कुटुंबांना एकत्र आणत “शिवविचार” समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला.

या शतकी मोहिमेच्या निमित्ताने शिवदुर्ग परिवाराने आजवर केलेले सर्व शिवकार्य शिवाई देवीच्या चरणी अर्पण केले. हा क्षण केवळ यशाचा नव्हता, तर भावनिक कृतज्ञतेचा आणि नव्या वाटचालीचा संकल्प करण्याचा होता. “नवीन शतक म्हणजे नव्या दिशेचा दीपस्तंभ” अशी भावना सर्व सदस्यांनी व्यक्त केली.

शिवदुर्गचे कार्य हे “ना नफा ना तोटा” या तत्वावर आधारित असून, तरुणाईपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांसाठी विश्वासाचे घर बनले आहे. महिला रणरागिणी, शिलेदार, राज्य कार्यकारिणी, सदस्य, हितचिंतक आणि माध्यम प्रतिनिधी यांच्या एकत्रित प्रयत्नांतून हा ऐतिहासिक टप्पा गाठता आला आहे.

आता पुढील वाटचालीत गडकिल्ले आणि वारसा संवर्धनासाठी महाराष्ट्रातील नामवंत इतिहासतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नवे उपक्रम राबवण्याचा निर्धार शिवदुर्गने व्यक्त केला आहे.

शिवदुर्गची ही शंभरी केवळ आकडा नाही तर ती आहे प्रेरणेची परंपरा, संघर्षाची कहाणी आणि शिवविचारांच्या अखंड ज्योतीची तेजस्वी साक्ष.