दरवाढ तात्काळ मागे घ्यावी; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
श्रीगोंदा | दि. 13 मार्च 2026
गणेश कविटकर
श्रीगोंदा : घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात शासनाने केलेल्या वाढीच्या निषेधार्थ श्रीगोंदा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलेंडरच्या दरात करण्यात आलेली वाढ ही सर्वसामान्य नागरिकांसाठी अन्यायकारक असल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी शासनाच्या धोरणांचा निषेध करत गॅस सिलेंडरच्या वाढीव दरामुळे सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक बजेट कोलमडत असल्याचे सांगितले. आधीच महागाईने नागरिक त्रस्त असताना गॅस सिलेंडरच्या दरात झालेली वाढ ही जनतेवर अतिरिक्त आर्थिक भार टाकणारी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
या वेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत ओगले यांनी शासनावर टीका करत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “सर्वसामान्य नागरिक आधीच महागाईच्या ओझ्याखाली दबलेले आहेत. अशा परिस्थितीत गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करणे म्हणजे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या स्वयंपाकघरावरच घाव घालण्यासारखे आहे. शासनाने जनतेच्या भावना लक्षात घेऊन ही दरवाढ तात्काळ मागे घ्यावी, अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन उभारले जाईल.”
या पार्श्वभूमीवर शासनाने तात्काळ गॅस सिलेंडरची दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच गॅस सिलेंडर नोंदणीच्या कालावधीबाबतही नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी निदर्शनास आणून दिले.
यानंतर शासनाचे प्रतिनिधी म्हणून प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना श्रीगोंदा काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
या आंदोलनात श्रीगोंदा मार्केट कमिटीचे संचालक व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत ओगले, श्रीगोंदा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संतोष भोयटे, श्रीगोंदा शहर काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. समित बोरुडे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष विकास काळे, वडळी गावचे सरपंच महेश दरेकर, माजी युवक अध्यक्ष गोरख बायकर, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष धनुभाऊ लगड तसेच सोहेल शेख, जितेंद्र पाटोळे, सुरज शेख, बाबासाहेब नलगे, भाऊ गावडे, योगेश शेळके आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, शासनाने ही दरवाढ तात्काळ मागे न घेतल्यास काँग्रेसच्या वतीने पुढील काळात आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.
