पेडगाव – श्रीगोंदा रस्त्यासाठी प्रशांत ओगले मैदानात; PWDला थेट अल्टिमेटम

७ सप्टेंबरपर्यंत काम सुरू करा; अन्यथा ८ सप्टेंबरपासून PWD कार्यालयात ठिय्या आंदोलन

 

श्रीगोंदा | दि. ०४ सप्टेंबर २०२६

गणेश कविटकर

 

पेडगाव–श्रीगोंदा (MDR-62) या महत्त्वाच्या मार्गाचे रखडलेले काम तातडीने सुरू करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती, श्रीगोंदाचे संचालक श्री. प्रशांत ओगले यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. पेडगाव, चोराचीवाडी, अधोरेवाडी व नवनाथनगर येथील ग्रामस्थांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या श्रीगोंदा कार्यालयात निवेदन देत प्रशासनाला काम सुरू करण्यासाठी थेट मुदत देण्यात आली.

रस्त्याचे काम दीर्घकाळापासून रखडल्याने नागरिक, वाहनचालक आणि विद्यार्थ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. वारंवार होणाऱ्या या त्रासाची दखल घेत प्रशांत ओगले यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी प्रशासनाला केवळ आश्वासन नको, तर प्रत्यक्ष काम हवे, अशी ठाम भूमिका मांडली.

सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ पर्यंत रस्त्याचे काम सुरू न झाल्यास मंगळवार, दि. ८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता PWD कार्यालय, श्रीगोंदा येथे ठिय्या आंदोलन करण्यात येईल. काम सुरू होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रश्नावर युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि बाजार समितीचे संचालक म्हणून प्रशांत ओगले यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे रस्त्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, आता PWD प्रशासन या अल्टिमेटमवर काय निर्णय घेते, याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.

यावेळी सुनील खेडकर, चेअरमन शहाजी खेडकर, सरपंच संतोष शिंदे, माजी सरपंच भगवान कनसे, विनोद अधोरे, सूरज शेख, युवराज शेलके, ओमकार लोखंडे, झहीर सय्यद, सचिन झीटे, तुषार उदमले, सचिन ससाणे, ओंकार उदमले, भीमराव लांडगे, संतोष उदमले, विठ्ठल चोर, दत्तात्रय अनभुले, सचिन चोर, संकेत दिडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.