आश्वासनावर उपोषण स्थगित; आता १५ दिवसांत हिशेब

शेतकऱ्यांच्या वीजप्रश्नांवर राजेंद्र म्हस्के आक्रमक; सुधारणा न झाल्यास ठेंभा मोर्चाचा इशारा

 

श्रीगोंदा | दि. ३१ ऑगस्ट २०२६

गणेश कविटकर

 

शेतकऱ्यांच्या वीजप्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के यांनी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर सुरू केलेले आमरण उपोषण महावितरण प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेतले. मात्र, हा आंदोलनाचा शेवट नसून प्रशासनाला दिलेली १५ दिवसांची मुदत आता खरी कसोटी ठरणार आहे.

पूर्ण दाबाने वीजपुरवठा, वारंवार खंडित होणारी वीज, लाईनच्या देखभालीतील दिरंगाई, सायंकाळी ६ ते ९ वाजताचे लोडशेडिंग, नवीन कृषीपंप जोडण्या आणि जुन्या जोडण्यांसाठी डी.पी. मंजुरी अशा अनेक प्रश्नांवर महावितरणने कार्यवाहीचे लेखी आश्वासन दिले आहे. रस्त्यालगत सोलर कंपनीने उभारलेले वीजपोल १५ फूट अंतरावर हलविण्याचेही प्रशासनाने मान्य केले आहे.

मात्र, कागदावरील आश्वासन आणि शेतकऱ्यांच्या शेतातील वास्तव यात फरक राहता कामा नये. प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविणे ही प्रक्रिया आहे; प्रश्न सुटणे हा निकाल आहे. शेतकऱ्याला वेळेवर, पुरेशा दाबाने आणि सुरळीत वीज मिळाली, तरच प्रशासनाच्या आश्वासनाला अर्थ प्राप्त होईल.

शेतकऱ्यांनी संयम दाखवत उपोषण मागे घेतले आहे. आता प्रशासनाने या संयमाची परीक्षा घेऊ नये. १५ दिवसांत ठोस सुधारणा झाली नाही, तर ठेंभा मोर्चाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात महावितरणची कार्यवाही केवळ प्रशासकीय विषय न राहता शेतकरी आणि प्रशासनातील विश्वासाचीही परीक्षा ठरणार आहे.

या आंदोलनावेळी हरिदास शिर्के, अनिल ठवाळ, रघुनाथ सूर्यवंशी, शहाजी कोरडकर, अशोक नवले, शशिकांत पवार, महादेव म्हस्के, अरुण जगताप, राजेंद्र विधाटे, गंगाराम दरेकर, हरिभाऊ खामकर, विलास म्हस्के यांच्यासह परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

राजकारणात शेतकरी हा नेहमीच केंद्रस्थानी असतो. मात्र त्याच शेतकऱ्याला मूलभूत वीजपुरवठ्यासाठी उपोषण करण्याची वेळ येत असेल, तर सत्ताधारी आणि प्रशासनाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.आता आश्वासनांचा काळ संपला; कृतीचा काळ सुरू झाला आहे. १५ दिवसांत शब्द पाळला तर प्रश्न मिटेल, अन्यथा ठेंभा मोर्चातून शेतकऱ्यांचा आवाज अधिक बुलंद होईल.