दि. 03 जून 2026
गणेश कविटकर
देशाचे संरक्षण करणारे सैनिक, समाजाला दिशा देणारे शिक्षक आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भूमिपुत्रांचा सन्मान हा समाजासाठी प्रेरणादायी ठरतो. अशाच भावनेतून लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायत व अग्नीपंख फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील भारतीय सैन्यदलातील सेवानिवृत्त जवान, शिक्षक, अधिकारी तसेच नुकतेच सैन्यदलात भरती झालेल्या जवानांचा विशेष सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपसभापती गणपतराव काकडे होते. यावेळी भारतीय सैन्यदलातील सेवानिवृत्त जवान नितीन काकडे, शिक्षक डी. आर. काकडे, रामदास साळवे, राजाराम गायकवाड, रामदास फटाकडे, अधिकारी शिवाजी जाधव तसेच भारतीय सैन्यदलात नव्याने भरती झालेला जवान अर्जुन धोत्रे यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
हा सन्मान सरपंच मनीषा नाहाटा, उपसरपंच चित्राताई धाकड, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव बापू मगर, सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी अध्यक्ष लालासाहेब काकडे, गोरख ओव्हळ आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहाटा यांनी केले. त्यांनी देशसेवा, समाजसेवा आणि शिक्षण क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव हा नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे सांगितले.
यावेळी गणपतराव काकडे, मधुकर पवार, दिलीप काकडे, डी. आर. काकडे, शिवाजी जाधव आणि राजाराम गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करताना देशभक्ती, कर्तव्यनिष्ठा आणि सामाजिक बांधिलकीचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमास राजेंद्र कुंदांडे, एम. डी. खंडागळे, बंडू खंडागळे, भास्कर कुंदांडे, लियाकत तांबोळी, सदाशिव खंडागळे, हनुमंत मगर, राहुल गोरखे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश गायकवाड यांनी केले.
देशसेवा, ज्ञानसेवा आणि कर्तृत्वाचा गौरव करणारा हा सन्मान सोहळा लोणी व्यंकनाथच्या सामाजिक ऐक्याचा आणि राष्ट्रप्रेमाचा प्रेरणादायी संदेश देणारा ठरला.
