शिलालेखांच्या शोधातून उजेडात येणार विस्मृतीतील इतिहास

दि. 04 जून 2026

गणेश कविटकर

 

शिलालेखांतून घडते भारतीय संस्कृती आणि इतिहासाचे दर्शन

 

श्रीगोंदा : इतिहास हा केवळ ग्रंथांच्या पानांतच नसतो, तर तो आपल्या गावोगावी विखुरलेल्या वारसा स्थळांमध्ये, मंदिरांच्या भिंतींवर, बारवांच्या कडांवर, समाधींवर आणि शिलालेखांमध्ये जिवंत स्वरूपात कोरलेला असतो. अशाच दुर्लक्षित पण अमूल्य ऐतिहासिक ठेव्यांना पुन्हा प्रकाशझोतात आणण्यासाठी शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन संचलित शिवदुर्ग वारसा संवर्धन समिती महत्त्वपूर्ण कार्य करीत आहे.

समितीच्या माध्यमातून गावोगावी अडगळीत पडलेल्या, दुर्लक्षित झालेल्या आणि काळाच्या ओघात विस्मृतीत गेलेल्या वारसा स्मारकांचे जतन व संवर्धन करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या वारसा स्थळांवरील शिलालेखांचे वाचन करून त्यामागील इतिहास, संस्कृती आणि तत्कालीन सामाजिक जीवनाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.

यासाठी महाराष्ट्रभर शिलालेख संशोधनाचा ध्यास घेतलेले पुणे येथील प्रसिद्ध शिलालेख वाचक व इतिहास संशोधक अनिल दुधाणे यांचा श्रीगोंदा व कर्जत तालुक्यात दोन दिवसीय अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यात विविध गावांमधील मंदिरे, बारवा, समाधी स्थळे, गधेगळ, वृंदावने आणि इतर ऐतिहासिक वास्तूंवरील शिलालेखांचे छायाचित्रण, ठसे व छाप घेण्यात आले.

इतिहास संशोधकांच्या मते, शिलालेख हा इतिहासाचा सर्वात अस्सल आणि विश्वासार्ह पुरावा मानला जातो. या शिलालेखांमधून तत्कालीन राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक परिस्थितीचे दर्शन घडते. गावाचा गौरवशाली इतिहास, पूर्वजांची कर्तृत्वगाथा आणि भारतीय संस्कृतीची समृद्ध परंपरा यांचे प्रतिबिंब या शिलालेखांतून स्पष्टपणे दिसून येते.

लवकरच या शिलालेखांचे ऐतिहासिक संदर्भांसह वाचन प्रसिद्ध करण्यात येणार असून, त्यामुळे इतिहासाच्या पानांत नोंद न झालेली अनेक महत्त्वाची माहिती नव्याने उजेडात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गावोगावच्या इतिहासप्रेमी तरुणांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला असून वारसा संवर्धनाची चळवळ अधिक बळकट होत आहे.

या अभ्यास दौऱ्याचे नियोजन शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश इंगळे यांनी केले. यावेळी दिगंबर भुजबळ, सचिन भोसले, अमोल बडे, गणेश कुदांडे, सोमेश शिंदे, मारुती वागसकर, प्रा. कानीफनाथ उगले, किरण शिंदे, नितीन वाबळे, शंकर जंबे, राजेश सांगळे, शुभम वाबळे आणि वेताळ सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

“शिलालेख म्हणजे इतिहासाची जिवंत साक्ष; त्यांच्या वाचनातून गावाचा गौरवशाली वारसा आणि भारतीय संस्कृतीचे वैभव नव्या पिढीसमोर उलगडत आहे.”