छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शिलालेखाचा ऐतिहासिक शोध……

गुरव पिंपरी येथील नागेश्वर महादेव मंदिरातील शिवकालीन शिलालेख दाखविताना शिलालेख वाचक अनिल दुधाणे.

कर्जत तालुका – शिलालेख वाचन

भाग १

गुरव पिंपरी येथे १६६४ सालातील मंदिर जीर्णोद्धाराची नोंद उजेडात…

 

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीतील सामाजिक, धार्मिक आणि स्थापत्य परंपरेचे दर्शन घडविणारा एक महत्त्वपूर्ण शिलालेख अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील गुरव पिंपरी येथे आढळून आला आहे. या शिलालेखाचे वाचन पुण्याचे प्रसिद्ध शिलालेख अभ्यासक अनिल किसन दुधाणे यांनी केले असून संशोधन राजेश पोपट इंगळे यांनी केले आहे. या शोधामुळे शिवकालीन ग्रामीण समाजजीवन, मंदिर संवर्धन आणि कारागिरांच्या योगदानाचा महत्त्वपूर्ण इतिहास प्रकाशात आला आहे.

गुरव पिंपरी येथील प्राचीन नागेश्वर महादेव मंदिराच्या सभामंडपातील खांबावर हा तीन ओळींचा शिलालेख कोरलेला आहे. वातावरणाचा परिणाम आणि वारंवार झालेल्या रंगरंगोटीमुळे अक्षरे काहीशी अस्पष्ट झाली असली तरी छाप घेतल्यानंतर संपूर्ण मजकूर स्पष्टपणे वाचता आला.

शिलालेखातील मजकूरानुसार –

१. माणकोजी खाती याने नवा षां

२. बा बसविळा सके १५८६ जेस्ट

३. वदी पाडवा सोमवार

 

“माणकोजी खाती याने नवा खांब बसविला. शके १५८६, ज्येष्ठ वद्य प्रतिपदा, सोमवार.”

या नोंदीचे कालगणनेनुसार रूपांतर केल्यास १६ मे १६६४, सोमवार हा दिवस समोर येतो. हा काळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचा असून त्या काळात नागेश्वर महादेव मंदिरात जीर्णोद्धाराचे काम झाल्याची नोंद या शिलालेखातून स्पष्ट होते.

अभ्यासक अनिल दुधाणे यांच्या मते, मंदिरातील सभामंडपाची जुनी तुळई तडा गेल्यामुळे तिच्या आधारासाठी माणकोजी खाती यांनी नवीन खांब बसविला. त्या कार्याची स्मृती म्हणून हा शिलालेख कोरण्यात आला. यावरून शिवकालीन समाजात धार्मिक स्थळांच्या देखभाल व संवर्धनाला विशेष महत्त्व दिले जात असल्याचे दिसून येते.

कारागिरांच्या योगदानाची दुर्मिळ नोंद

या शिलालेखातील सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे “खाती” या शब्दाचा उल्लेख. इतिहास संशोधनानुसार खाती हा शब्द सुतार, स्थापत्यकार किंवा बांधकामाशी संबंधित कुशल कारागिरांसाठी वापरला जात असे. राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील अनेक शिलालेखांत या शब्दाचा उल्लेख आढळतो.

“माणकोजी खाती” या नावावरून त्या काळातील कारागिरांचे योगदान केवळ प्रत्यक्ष कामापुरते मर्यादित नव्हते, तर त्यांच्या कार्याची ऐतिहासिक नोंद ठेवण्याची परंपराही अस्तित्वात होती, हे स्पष्ट होते. त्यामुळे हा शिलालेख शिवकालीन कारागिरांच्या सामाजिक स्थानाचा महत्त्वपूर्ण पुरावा मानला जात आहे.

शिवकालीन वारशाचा जिवंत दस्तऐवज

सतराव्या शतकातील हा शिलालेख केवळ मंदिराच्या जीर्णोद्धाराची नोंद नसून त्या काळातील धार्मिक श्रद्धा, सामाजिक बांधिलकी, स्थापत्यकला आणि ग्रामीण व्यवस्थेचे प्रतिबिंब आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गावागावांतील मंदिरे जतन करण्यासाठी समाजातील विविध घटक कसे एकत्र येत होते, याचेही हे महत्त्वपूर्ण उदाहरण ठरते.

या शिलालेखाच्या शोधकार्य व छाप घेण्यासाठी बबन वेताळ, दिगंबर भुजबळ, प्रा. कानीफनाथ उगले तसेच स्थानिक नागरिकांचे सहकार्य लाभले. शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन संचालित शिवदुर्ग वारसा संवर्धन समिती यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा ऐतिहासिक वारसा प्रकाशझोतात आला आहे.

इतिहासाच्या पाऊलखुणा जपणाऱ्या अशा शोधांमुळे शिवकालीन महाराष्ट्राचा गौरवशाली वारसा नव्या पिढीसमोर येत असून आपल्या सांस्कृतिक संपदेच्या संवर्धनाची प्रेरणा मिळत आहे.