श्रीगोंदा | दि. 06 जून 2026
गणेश कविटकर
शासनाने जाहीर केलेल्या कथित फसव्या कर्जमाफीविरोधात तसेच संबंधित आदेशाच्या निषेधार्थ श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर सोमवार, दि. ८ जून २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता जाहीर निषेध बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीचे आयोजन शेतकरी एकजूट मंचाच्या वतीने करण्यात आले असून तालुक्यातील सर्व शेतकरी, शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, सहकारी संस्थांचे प्रतिनिधी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या बैठकीत शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील त्रुटी, शेतकऱ्यांवर झालेला अन्याय, तसेच थकबाकीदार शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. याशिवाय शासनाच्या संबंधित आदेशाची प्रतीकात्मक होळी करून निषेध नोंदविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
बैठकीत आगामी आंदोलनाची दिशा निश्चित करणे, कर्जमाफी संदर्भातील पुढील भूमिका ठरविणे आणि शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी एकत्रित लढा उभारण्याबाबत चर्चा होणार आहे. तालुक्यातील विविध शेतकरी संघटनांचे प्रमुख, पदाधिकारी, सहकारी सोसायट्यांचे चेअरमन व संचालक, तसेच थकबाकीदार शेतकरी या बैठकीस उपस्थित राहणार आहेत.
या निषेध बैठकीचे संयोजन शेतकरी नेते तथा पाटपाणी कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र (आबा) म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी एकत्र येऊन आवाज बुलंद करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
