श्रीगोंदा | दि. ६ जून 2026
गणेश कविटकर
मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड पक्षाच्या संयुक्त विद्यमाने श्रीगोंदा शहरातील शनी चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त भव्य शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करून हा ऐतिहासिक सोहळा भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे नियोजन संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शामभाऊ जरे यांनी केले. प्रारंभी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष प्रा. सुनील गायकवाड यांनी प्रास्ताविकातून शिवराज्याभिषेक दिनाचे ऐतिहासिक महत्त्व आणि स्वराज्य संकल्पनेचा वारसा याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी ह.भ.प. संपत महाराज लांडगे यांच्या हस्ते विधिवत राज्याभिषेक पूजा संपन्न झाली. संभाजी ब्रिगेडचे तालुका उपाध्यक्ष दिलीप लबडे व त्यांच्या धर्मपत्नी यांनी सपत्नीक पूजाविधी करून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.
सोहळ्यात प्रसिद्ध लेखक व व्याख्याते महेंद्र मिसाळ, प्रा. खरसडे आणि प्रा. सचिन झगडे यांनी उपस्थितांना शिवचरित्र, शिवविचार तसेच स्वराज्याच्या संकल्पनेविषयी सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या विचारांमधून छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रनिर्माण, सामाजिक बांधिलकी आणि लोककल्याणकारी शासन यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमास छत्रपती संभाजी महाराज सेवा समितीचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद लगड, माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे, संभाजी ब्रिगेडचे संतोष आरडे (मेजर), घनश्याम काळे, यशवंत सेनेचे संस्थापक अध्यक्ष आदेश शेंडगे, छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीचे सदस्य दीपक मखरे यांच्यासह विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शहरातील ज्येष्ठ नागरिक, शिवप्रेमी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. शिवराज्याभिषेकाच्या ऐतिहासिक स्मृतींना उजाळा देत स्वराज्य, सामाजिक एकात्मता आणि राष्ट्रनिष्ठेचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
