दि. 06 जून 2026 गणेश कविटकर
कर्जत तालुका – शिलालेख वाचन
भाग – 2
अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मौजे बेनवडी येथील प्रसिद्ध श्री हरिनारायण स्वामी मंदिर परिसरात असलेल्या वृंदावन समाधीस्थळांवरील एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक शिलालेख नुकताच अभ्यासकांच्या नजरेस पडला असून, त्यामधून भगवद्गीतेचे तत्त्वज्ञान, वैष्णव भक्तिपरंपरा आणि संतसंस्कृतीचा अनमोल वारसा समोर आला आहे.
श्री हरिनारायण स्वामी मंदिराच्या मुख्य तटबंदी प्रवेशद्वारासमोर असलेल्या पाच समाधीस्थळांपैकी एका समाधीवर हा शिलालेख कोरलेला आहे. देवनागरी लिपीत आणि संस्कृत भाषेत कोरलेला हा पाच ओळींचा उठाव स्वरूपातील लेख अनेक वर्षे उघड्यावर असल्याने काही प्रमाणात झिजला असला, तरी त्याचा छाप घेतल्यानंतर मजकूर स्पष्टपणे वाचता आला.
शिलालेखाचे वाचन –
१॥ श्री ॥
२.॥ यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः ॥
३.॥ तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ॥१॥
४.॥ श्री हरी नारायण समर्थ ॥
५.॥ श्री लक्ष्मी नृसिंह समाधी ॥
या शिलालेखात भगवद्गीतेच्या अठराव्या अध्यायातील प्रसिद्ध श्लोक कोरलेला आहे.
“यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः ।
तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ॥”
गीतेच्या अंतिम संदेशांपैकी हा एक महत्त्वपूर्ण श्लोक मानला जातो. समाधीस्थळावर या श्लोकाचा समावेश करण्यात आल्याने समाधिस्थ महात्म्याचे जीवन ज्ञान, भक्ती, कर्म, नीती आणि धर्मनिष्ठ मूल्यांवर आधारलेले होते, असा संदेश या शिलालेखातून व्यक्त होत असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.
शिलालेखात ‘श्री हरी नारायण समर्थ’ तसेच ‘श्री लक्ष्मी नृसिंह समाधी’ असा उल्लेख आढळून येतो. यावरून त्या काळातील वैष्णव परंपरा, लक्ष्मी-नृसिंह उपासना आणि स्थानिक संतसंप्रदायाची माहिती मिळते. मराठा कालखंडातील अठराव्या शतकात कोरलेला हा लेख स्थानिक धार्मिक व सामाजिक इतिहासाचा महत्त्वपूर्ण दस्तऐवज मानला जात आहे.
इतिहास संशोधकांच्या मते, भगवद्गीतेचे तत्त्वज्ञान केवळ धार्मिक ग्रंथांपुरते मर्यादित न राहता लोकजीवन, संतपरंपरा आणि स्मारक-लेखनातही खोलवर रुजले होते, याचा हा शिलालेख जिवंत पुरावा आहे. अनेकदा लिखित इतिहासात नोंद न झालेल्या स्थानिक संतपरंपरा अशा शिलालेखांमुळेच प्रकाशात येतात. त्यामुळे हा लेख स्थानिक इतिहास, धर्मसंस्कृती आणि वारसा अभ्यासासाठी अत्यंत मौल्यवान ठरतो.
या शिलालेखाचे वाचन प्रसिद्ध शिलालेख अभ्यासक अनिल किसन दुधाणे यांनी केले असून संशोधन राजेश पोपट इंगळे यांनी केले आहे. तसेच शिलालेखाचा छाप घेण्यासाठी दिगंबर भुजबळ, सचिन भोसले आणि देशपांडे परिवार यांचे सहकार्य लाभले. शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन संचलित शिवदुर्ग वारसा संवर्धन समितीने हा ऐतिहासिक वारसा उजेडात आणण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न केले आहेत.
बेनवडीतील हा शिलालेख केवळ समाधीची ओळख करून देणारा लेख नसून भगवद्गीतेचा अंतिम संदेश, वैष्णव भक्तिपरंपरा, संतसंस्कृतीचा गौरव आणि धर्मनिष्ठ जीवनमूल्यांचा वारसा जतन करणारा एक प्रभावी ऐतिहासिक दस्तऐवज असल्याचे संशोधकांनी नमूद केले आहे.
