श्रीगोंदा, दि. ६ जून : 2026
गणेश कविटकर
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळावा, कर्जमाफीतील त्रुटी दूर कराव्यात आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, या मागण्यांसाठी श्रीगोंदा तालुका काँग्रेस कमिटी व श्रीगोंदा तालुका युवक काँग्रेसच्या वतीने सोमवार, दि. ८ जून २०२६ रोजी भव्य ट्रॅक्टर रॅली आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
कांद्याच्या घसरलेल्या बाजारभावामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. उत्पादन खर्च वाढत असताना मिळणारा दर अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या कांदा पिकासाठी प्रति किलो २५ रुपये हमीभाव जाहीर करून त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी, ही आंदोलनाची प्रमुख मागणी आहे.
याशिवाय महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनांमधील त्रुटी दूर करून सर्व पात्र शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी संबंधित आदेशांमध्ये आवश्यक फेरबदल करण्यात यावेत, अशीही मागणी करण्यात येणार आहे. शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध व्यक्त करण्यासाठी संबंधित आदेशांची प्रतीकात्मक होळी करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
सकाळी १० वाजता श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती येथून ट्रॅक्टर रॅलीला सुरुवात होणार असून तहसील कार्यालयावर मोर्चाचा समारोप होणार आहे. या आंदोलनात तालुक्यातील शेतकरी, कार्यकर्ते व काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
या आंदोलनाचे नेतृत्व प्रशांत भैय्या ओगले (उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस तथा संचालक, श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती) करणार असून संतोष भोईटे (अध्यक्ष, श्रीगोंदा तालुका काँग्रेस कमिटी), ॲड. समित बोरुडे (अध्यक्ष, श्रीगोंदा शहर काँग्रेस कमिटी), सुनिता दरोडे (अध्यक्ष, महिला काँग्रेस कमिटी श्रीगोंदा), विकास काळे (अध्यक्ष, श्रीगोंदा तालुका युवक काँग्रेस) आणि मुजफ्फर मालजपत्ते (अध्यक्ष, श्रीगोंदा शहर युवक काँग्रेस) यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन पार पडणार आहे.
शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी होणाऱ्या या लढ्यात तालुक्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकरी, युवक, महिला व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
