शिवदुर्गच्या शिलेदारांनी नऊ वर्षांपासून जपली ऐतिहासिक दसरा तोरणाची परंपरा
धर्मवीरगड, दिल्ली वेससह ऐतिहासिक वेशींना झेंडूच्या फुलांचे तोरण; स्वच्छता, पूजनातून ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनाचा संदेश
श्रीगोंदा | दि. 22 ऑक्टोबर 2026
गणेश कविटकर
घराला तोरण बांधण्यापूर्वी गावाच्या वेशीला तोरण बांधायचे, ही केवळ एक परंपरा नाही, तर आपल्या पूर्वजांच्या शौर्याचा, गावाच्या अस्मितेचा आणि ऐतिहासिक वारशाविषयीच्या कृतज्ञतेचा जागर आहे. ‘आधी तोरण गडाला, मग घराला’ आणि ‘आधी तोरण वेशीला, मग दाराला’ हा विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवत शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशनच्या शिलेदारांनी यंदाही दसऱ्याच्या निमित्ताने ऐतिहासिक तोरण बांधण्याची परंपरा उत्साहात जपली. यंदा या उपक्रमाचे नववे वर्ष होते.
विजयादशमीच्या निमित्ताने शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशन परिवाराच्या वतीने श्रीगोंदा येथील ऐतिहासिक दिल्ली वेस परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. परिसर स्वच्छ केल्यानंतर झेंडूच्या फुलांच्या माळांनी वेशीला तोरण बांधून पूजन करण्यात आले. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले धर्मवीरगडावर वेशीला तोरण बांधून शौर्यस्तंभाचे पूजन करण्यात आले. या उपक्रमातून इतिहासाविषयी आदर व्यक्त करण्याबरोबरच ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि संवर्धन करण्याचा संदेश देण्यात आला.
श्रीगोंदा तालुक्यातील ऐतिहासिक वारशाचे प्रतीक असलेल्या किल्ले धर्मवीरगड, श्रीगोंदा येथील पानिपत शौर्य वेस आणि दिल्ली वेस येथे दसरा तोरण बांधण्यात आले. त्याचबरोबर गावोगावी इतिहासाच्या साक्षीदार म्हणून उभ्या असलेल्या वेशींनाही तोरण बांधून पूजन करण्यात आले. पेडगाव येथे गोरख कदम, काष्टी येथे अमोल बडे, घारगाव येथे चेतन चौधरी व संभाजी चौधरी, तसेच पिसोरे खांड येथे दत्ताजी जरे यांनी आपल्या गावातील वेशींना तोरण बांधून या उपक्रमात सहभाग नोंदविला.
परंपरेतून इतिहासाशी नाते जोडण्याचा प्रयत्न
गावाची वेस म्हणजे केवळ दगड-विटांनी उभी असलेली वास्तू नव्हे. गावाच्या वैभवशाली इतिहासाची, पूर्वजांच्या कर्तृत्वाची आणि अनेक ऐतिहासिक घटनांची ती साक्षीदार असते. काळाच्या ओघात अशा वास्तूंकडे दुर्लक्ष होऊ नये, नव्या पिढीला त्यांच्या ऐतिहासिक महत्त्वाची जाणीव व्हावी आणि गड-किल्ले व ऐतिहासिक स्थळांविषयी अभिमान निर्माण व्हावा, या उद्देशाने शिवदुर्ग परिवार गेल्या नऊ वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहे.
दसऱ्याला घराच्या दाराला तोरण बांधण्याची परंपरा सर्वत्र पाहायला मिळते. मात्र, आपल्या गावाच्या प्रवेशद्वाराला, ऐतिहासिक वेशीला आणि गडाच्या प्रवेशद्वाराला तोरण बांधून त्या वास्तूंचे स्मरण करण्याची संकल्पना शिवदुर्गच्या शिलेदारांनी कृतीतून जिवंत ठेवली आहे. उत्सवाच्या आनंदाला इतिहासाच्या जतनाची जोड देणारा हा उपक्रम लक्षवेधी ठरत आहे.
“वेस ही आपल्या संस्कृतीची आणि अस्मितेची निशाणी” -राजेश इंगळे
राजेश इंगळे, अध्यक्ष, शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशन म्हणाले, “गावोगावच्या वेशी वीरांच्या शौर्यगाथा सांगणाऱ्या आहेत. अनेक अभिमानास्पद घटनांचा हा वारसा साक्षीदार आहे. दसऱ्याला घराला तोरण बांधणे ही आपली संस्कृती आणि परंपरा आहे. मात्र, ‘आधी तोरण वेशीला, मग आमच्या घराला’ हा विचारही तितकाच महत्त्वाचा आहे. आपल्या पूर्वजांनी जपलेला हा ऐतिहासिक वारसा आपणही जपला पाहिजे. शिवदुर्गची तरुण पिढी नऊ वर्षांपासून ही परंपरा जपत आहे, ही अभिमानाची बाब आहे.”
इतिहासाच्या जतनासाठी शिलेदारांचा सहभाग
किल्ले धर्मवीरगड येथे तालुका संपर्कप्रमुख ईश्वर कोठारे, गोरख कदम आणि आविष्कार इंगळे सहभागी झाले. श्रीगोंदा येथील दिल्ली वेस परिसरात संवर्धन समितीचे अध्यक्ष दिगंबर भुजबळ, डॉ. चंद्रशेखर कळमकर, शिवकुमार गोसावी, जालिंदर पाडळे, मारुती वागसकर, ॲड. गोरख कडूस, सचिन भोसले, अमोल बडे, मिठू लंके, चेतन चौधरी, संभाजी चौधरी आणि शंभूराजे कडूस यांनी दसरा तोरण बांधण्याच्या उपक्रमात सहभाग घेतला.
परंपरा जपताना इतिहासाची आठवण आणि इतिहास जपताना पुढच्या पिढीची जबाबदारी, असा संदेश देणारा शिवदुर्ग परिवाराचा हा उपक्रम विजयादशमीच्या सणाला ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनाची अर्थपूर्ण जोड देणारा ठरला.
