कोळगावात जागतिक महिला दिनानिमित्त ‘शिवीबंदी’चा ऐतिहासिक ठराव.

महिलांचा पुढाकार; गावात शिवी दिल्यास ५०० रुपयांचा दंड, स्वच्छतेसाठीही ठोस निर्णय

श्रीगोंदा | दि. 08 मार्च 2026

गणेश कविटकर

श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिलांनी एक प्रेरणादायी आणि समाजाला दिशा देणारा निर्णय घेत गावात ‘शिवीबंदी’चा ठराव मंजूर केला. गावात कोणीही आई – बहिणींवरून शिवीगाळ केल्यास संबंधित व्यक्तीवर ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय विशेष महिला ग्रामसभेत सर्वानुमते घेण्यात आला.

दि. ८ मार्च २०२६ रोजी ग्रामपंचायत कोळगाव यांच्या वतीने शासन निर्णयानुसार विशेष महिला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ अंगणवाडी सेविका श्रीमती शकुंतला देशमुख होत्या. अध्यक्षपदाची सूचना अंगणवाडी सेविका सौ. विद्या लगड यांनी मांडली, तर त्यास अनुमोदन सौ. मीना भापकर यांनी दिले. ग्रामपंचायत अधिकारी एस. एस. कवडे यांनी ग्रामसभेचा अजेंडा वाचून दाखविला.

ग्रामसभेमध्ये शेतीसह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गावातील महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महिला सक्षमीकरण, व्यसनमुक्ती, स्वच्छता आणि सामाजिक संस्कार यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली.

गावातील सामाजिक वातावरण अधिक सुसंस्कृत आणि सकारात्मक ठेवण्यासाठी शिवीबंदीचा ठराव करण्यात आला. कोणताही ग्रामस्थ आई-बहिणींवरून शिवीगाळ करत असल्याचा व्हिडिओ पुरावा ग्रामपंचायतीकडे सादर केल्यास संबंधित व्यक्तीकडून ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येईल, असे ठरविण्यात आले.

यासोबतच गाव स्वच्छ ठेवण्याबाबतही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. प्रत्येकाने आपले घर, दुकान आणि परिसर स्वच्छ ठेवावा. कोणाच्या घराजवळ किंवा दुकानाजवळ कचरा आढळल्यास त्याचा फोटो ग्रामपंचायतीकडे सादर केल्यावर संबंधित व्यक्तीवर १०० रुपयांचा दंड आकारण्यात येईल, असा निर्णयही सर्वानुमते घेण्यात आला.

या ग्रामसभेला ग्रामपंचायत कोळगावचे लोकनियुक्त सरपंच पुरुषोत्तम यशवंत लगड, उपसरपंच विलास बाळासाहेब शितोळे, ग्रामपंचायत सदस्य जयराज लगड, महेंद्र रणसिंग, कल्याण आढाव, प्रशांत आढाव, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष दत्तात्रय (गोटू) लगड, ग्रामपंचायत अधिकारी एस. एस. कवडे, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका आणि गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी सरपंच पुरुषोत्तम लगड यांनी उपस्थित सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत महिला सक्षमीकरणासाठी ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त केली. पुढील वर्षी महिला दिन अधिक मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.

अध्यक्षीय समारोपात श्रीमती शकुंतला देशमुख यांनी सर्व महिलांचे कौतुक करत ग्रामपंचायतीने उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान केल्याबद्दल आभार मानले.

महिलांच्या पुढाकारातून कोळगावात घेतलेला ‘शिवीबंदी’चा हा निर्णय केवळ गावापुरता मर्यादित न राहता समाजात संस्कार, आदर आणि सुसंस्कृत संवादाची नवी परंपरा निर्माण करणारा ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.