“जागर युवा प्रतिष्ठान”च्या उद्घाटनातून सामाजिक सेवेचा नवा दीप प्रज्वलित…

लोणी व्यंकनाथमध्ये वाढदिवस साजरा झाला समाजहिताच्या संकल्पांनी; विविध सामाजिक उपक्रमांनी ग्रामस्थ भारावले

श्रीगोंदा : दि. 26 मे 2026

गणेश कविटकर

आजच्या दिखाऊ आणि खर्चिक वाढदिवसांच्या काळात लोणी व्यंकनाथ येथे एका वाढदिवसाने समाजासमोर आदर्श निर्माण केला. जैन महामंडळाचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष मितेश नाहटा यांच्या वाढदिवसानिमित्त “जागर युवा प्रतिष्ठान” या सामाजिक संघटनेचे उद्घाटन उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडले. हा सोहळा केवळ शुभेच्छांचा न राहता समाजसेवा, गावाविषयीची कृतज्ञता आणि स्व. अजित पवार यांच्या कार्यस्मृतींना उजाळा देणारा ठरला.

वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गावातील हनुमान मंदिर बांधकामासाठी नाहटा परिवारातर्फे ₹२,२१,००० ची देणगी जाहीर करण्यात आली. तसेच ५००० लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टँकरचे लोकार्पण करून नागरिकांसाठी मोफत पाणीपुरवठ्याची सुविधा सुरू करण्यात आली.

याशिवाय स्व. खंडू आप्पासाहेब काकडे यांच्या परिवारातील तीन मुलांच्या शिक्षणासाठी तब्बल ७५ हजार कुटुंबियांना मदत देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. कु. वैष्णवी दत्तात्रय गोरखे हिच्या ११ वी पासून पुढील महाविद्यालयीन शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारण्यात आली. तसेच श्री. मारुती दत्तात्रय लबडे यांच्या शस्त्रक्रियेसाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला.

कार्यक्रमात आयोजित मोफत चष्मा शिबिरालाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात सुमारे ३०० नागरिकांना उत्तम प्रतीचे चष्मे वाटप करण्यात आले. या सर्व उपक्रमांमुळे वाढदिवसाचा कार्यक्रम हा समाजासाठी आधार आणि प्रेरणा देणारा ठरला.

कार्यक्रमावेळी बोलताना मितेश नाहटा भावुक झाले. “गावामुळेच आज मी या स्थानापर्यंत पोहोचलो आहे. ग्रामपंचायतीपासून सुरू झालेला माझा प्रवास हा गावकऱ्यांच्या प्रेम, विश्वास आणि सहकार्यामुळेच शक्य झाला. त्यामुळे गावाच्या विकासासाठी आणि सर्वसामान्यांच्या सेवेसाठी सदैव कार्यरत राहणार आहे,” असे त्यांनी सांगितले.

स्वर्गीय अजित पवार यांनी दिलेली सामाजिक बांधिलकीची शिकवणच पुढील वाटचालीची प्रेरणा असल्याचे सांगताना त्यांच्या शब्दांत कृतज्ञतेची भावना स्पष्ट जाणवत होती. समाजहिताचे कार्य हेच खरे राजकारण असल्याचा संदेश त्यांनी यावेळी दिला.

कार्यक्रमाचे उद्घाटक टिळक भोस यांनी स्व. अजित पवार आणि नाहटा कुटुंबीयांच्या सामाजिक व राजकीय संबंधांचा उल्लेख करत लोणी गावाच्या विकासातील योगदानाची आठवण करून दिली. “स्व. अजित पवार आज आपल्या सोबत असते, तर लोणी व्यंकनाथ गाव विकासाच्या नकाशावर आणखी ठळकपणे झळकले असते,” असे ते म्हणाले.

राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहटा यांनीही वाढदिवस म्हणजे समाजाला काहीतरी देण्याची संधी असल्याचे सांगत समाजहित आणि सेवा हीच आमची खरी भूमिका राहील, असे स्पष्ट केले.

“जागर युवा प्रतिष्ठान”च्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, गरजूंना मदत आणि विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. ग्रामस्थांच्या मोठ्या उपस्थितीत पार पडलेला हा कार्यक्रम अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आणि मनात समाजसेवेची प्रेरणा निर्माण करून गेला.