एका बापाची जगण्यासाठी हाक; पैशांअभावी थांबली किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया — तीन चिमुकल्यांच्या भविष्याचा प्रश्न

श्रीगोंदा | दि. 06 मे 2026

गणेश कविटकर

जीवन किती अनिश्चित असतं, याचं जिवंत उदाहरण म्हणजे श्रीगोंद्यातील संदीप बजरंग घोडके यांची कहाणी. वयाची अवघी चाळीशी… खांद्यावर संसाराची जबाबदारी… दोन लहान मुली, एक मुलगा आणि पत्नी असा आनंदी कुटुंबवत्सल संसार; पण २०२३ पासून या कुटुंबावर जणू संकटांची मालिका कोसळली आहे. संदीप यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने त्यांच्या आयुष्याचा संघर्ष अधिकच भीषण बनला आहे.

कुटुंबाचा एकमेव कर्ता असलेले संदीप आजाराशी झुंज देत असतानाही, “माझ्या मुलांनी उपाशी राहू नये,” या जिद्दीने रोज काम करत आहेत. मात्र आता आजाराने उग्र रूप धारण केले असून, डॉक्टरांनी किडनी प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय सांगितला आहे. २४ एप्रिल २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात शस्त्रक्रिया ठरली होती; पण लाखो रुपयांचा खर्च उभा राहू न शकल्याने, त्यांना निराश मनाने परत फिरावं लागलं.

ही वेळ संदीप आणि त्यांच्या कुटुंबासाठी केवळ आर्थिक नाही, तर मानसिकदृष्ट्याही अत्यंत वेदनादायक ठरली आहे. माध्यमांशी बोलताना संदीप यांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले. ते हतबल स्वरात म्हणाले, “मला मृत्यूची भीती नाही, पण माझ्यामागे माझ्या लहान मुलांचं काय होईल? त्यांच्या शिक्षणाचं, त्यांच्या आयुष्याचं काय?” — हा प्रश्न आज प्रत्येक संवेदनशील मनाला अस्वस्थ करणारा आहे.

काही मित्रमंडळी आणि सामाजिक संस्थांनी मदतीचा हात पुढे केला असला, तरी शस्त्रक्रियेचा खर्च प्रचंड असल्याने अजूनही मोठ्या आर्थिक मदतीची गरज आहे. माणुसकी, सहानुभूती आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या श्रीगोंदा तालुक्याने यापूर्वी अनेक संकटांमध्ये धावून मदत केली आहे. आज पुन्हा एकदा एका बापाच्या जगण्यासाठी, तीन चिमुकल्यांच्या भविष्यासाठी समाजाने एकत्र येण्याची वेळ आली आहे.

‘एक हात मदतीचा’ पुढे करा…

तुमच्या छोट्याशा योगदानाने संदीप यांना नवं आयुष्य मिळू शकतं. त्यांच्या मुलांच्या डोक्यावरचं बापाचं छत्र कायम राहू शकतं.

मदतीसाठी बँक तपशील:

बँक: स्टेट बँक ऑफ इंडिया

नाव: श्री. संदीप बजरंग घोडके

खाते क्रमांक: 34467623807

IFSC: SBIN0000295

आपला एक छोटासा वाटा, एका कुटुंबाचा संसार वाचवू शकतो…