पानिपतचे रोड मराठे महाराष्ट्र दौऱ्यावर; श्रीगोंद्यात इतिहासाच्या बंधुत्वाची नव्याने उजळणी

तरुण पिढीने पानिपतचा वारसा जपावा – मराठा राजेश कल्याण यांचे आवाहन

श्रीगोंदा | दि. 07 मे 2026

गणेश कविटकर

१७६१ च्या तिसऱ्या पानिपत युद्धात महाराष्ट्रातून हरियाणात गेलेल्या आणि तेथेच स्थायिक झालेल्या मराठा वीरांच्या वंशजांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राशी भावनिक नाळ जोडण्यासाठी “पानिपत महाराष्ट्र संपर्क अभियान” अंतर्गत श्रीगोंदा शहराला भेट दिली. इतिहास, पराक्रम आणि बंधुत्वाच्या स्मृतींना उजाळा देणारा हा दौरा श्रीगोंदेकरांसाठी प्रेरणादायी ठरला.

अखिल भारतीय मराठा जागृती मंच, पानिपत (हरियाणा) यांच्या वतीने आयोजित या दौऱ्यात संस्थापक सदस्यांनी श्रीगोंदा शहरात आगमन करून पानिपत आणि श्रीगोंदा यांच्यातील ऐतिहासिक नात्याची नव्याने जाणीव करून दिली. श्रीगोंदा नगरपालिकेच्या सभागृहात पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी परिक्रमा इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षा प्रतिभाताई पाचपुते, नगराध्यक्षा सुनीताताई खेतमाळीस, उपनगराध्यक्ष अलका अनभुले, नगरसेवक शहाजी खेतमाळीस, चांदणी खेतमाळीस, मीरा शिंदे, सोनाली गोरे यांच्यासह संजय खेतमाळीस, अक्षय अनभुले व तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

पानिपत चळवळीचे संस्थापक तथा कोर कमिटी सदस्य मराठा राजेश कल्याण, मराठा कृषीपाल कसबरे, भागासिंग बाळदे, सुरजीत महाले, कृष्णा कल्याण तसेच मंचाचे राष्ट्रीय समन्वयक कोल्हापूरचे मिलिंद पाटील यांनी उपस्थित राहून इतिहास संवर्धनाचा संदेश दिला.

या प्रसंगी पानिपत शौर्य दिवस आणि रोड मराठ्यांच्या इतिहासावर आधारित संवादातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. तसेच १४ जानेवारी २०२७ रोजी हरियाणातील बस्ताडा, कर्नाल येथे होणाऱ्या भव्य ऐतिहासिक सोहळ्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले.

हरियाणा येथील रोड मराठा मंचाचे उपाध्यक्ष मराठा राजेश कल्याण यांनी श्रीगोंदेकरांच्या आदरातिथ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की, “श्रीगोंदा ही पानिपत वीरांची भूमी आहे. येथील तरुण पिढीने आपल्या इतिहासाचा आणि शौर्यपरंपरेचा अभिमान बाळगून हा वारसा जपला पाहिजे.” त्यांनी पानिपत आणि श्रीगोंदा यांचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी राजेश इंगळे करत असलेल्या कार्याचे विशेष कौतुक केले.

दौऱ्यादरम्यान प्रतिनिधींनी श्रीगोंदा शहरातील ऐतिहासिक स्थळांना भेट दिली. महादजी शिंदे राजवाडा, उत्तरवेस, दिल्ली वेस तसेच सरदार जानराव वाबळे यांच्या समाधीस्थळास भेट देऊन इतिहासाला अभिवादन करण्यात आले. शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनच्या कार्यालयात सदस्यांशी संवाद साधण्यात आला. तसेच म्हातार पिंप्री येथील सरदार जानराव वाबळे यांच्या वाड्यास भेट देऊन वाबळे परिवाराला पानिपत येथील कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले.

सरदार नेताजी पालकर यांचे वंशज गणेशजी पालकर आणि शरद भोसले यांनी काष्टी येथील शिवनेरी चौकात पानिपत टीमचे स्वागत केले. सीमा पाचपुते यांनी पारंपरिक औक्षण करून पाहुण्यांचे स्वागत केले.

या ऐतिहासिक दौऱ्याचे समन्वयन शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश इंगळे यांनी केले. राष्ट्रीय मुख्य समन्वयक मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात डॉ. चंद्रशेखर कळमकर, मारुती वागस्कर, अजित दळवी, सुचित्रा दळवी, संगीता इंगळे, सचिन भोसले, दिगंबर भुजबळ, अमोल बडे, अक्षय गायकवाड, रहीम हवालदार, जालिंदर पाडळे, महेश क्षीरसागर, विठ्ठल ढाणे, अभिजीत भोसले, संकेत नलगे, गणेश कुंदांडे, ईश्वर कोठारे, प्रकाश मोटे यांच्यासह अहिल्यानगर व सातारा जिल्ह्यातील अनेक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इतिहास, शौर्य आणि बंधुत्व यांची प्रेरणादायी सांगड घालणारा हा दौरा श्रीगोंदा आणि पानिपत यांच्यातील ऐतिहासिक नातेसंबंध अधिक दृढ करणारा ठरला.