जिद्द, चिकाटी व मेहनत हीच यशाची खरी त्रिसूत्री : महेश जंजिरे

UPSC मधून केंद्रीय पोलिस दलात असिस्टंट कमांडंटपदी नियुक्ती; रेसिडेन्शियल हायस्कूलतर्फे विशेष गौरव

श्रीगोंदा | दि. 21 मे 2026

गणेश कविटकर

अहिल्यानगर : “स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी मोठ्या सुविधा किंवा आर्थिक बळाची गरज नसते; जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण मेहनत हीच यशाची खरी त्रिसूत्री आहे,” असे प्रेरणादायी प्रतिपादन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) माध्यमातून केंद्रीय पोलिस दलात थेट असिस्टंट कमांडंटपदी नियुक्ती झालेले महेश जंजिरे यांनी केले.

अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या रेसिडेन्शियल हायस्कूलचे माजी विद्यार्थी असलेल्या महेश ईश्वर जंजिरे यांनी UPSCच्या कठीण स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत केंद्रीय पोलिस दलात असिस्टंट कमांडंट पद मिळविले आहे. खडतर प्रशिक्षण पूर्ण करून ते आता देशसेवेत रुजू होत असून, त्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल संस्थेतर्फे विशेष गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे व सचिव ॲड. विश्वासराव आठरे पाटील यांच्या हस्ते महेश जंजिरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या खजिनदार ॲड. दीपलक्ष्मी म्हसे, सहसचिव मुकेश मुळे, कार्यकारिणी सदस्या अरुणा काळे, प्राचार्य धनंजय म्हस्के, उपप्राचार्य दादासाहेब वांढेकर, प्रा. रवींद्र देवढे, प्रा. डॉ. सुधाकर सुंबे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना अध्यक्ष रामचंद्र दरे व सचिव विश्वासराव आठरे पाटील यांनी महेश जंजिरे यांच्या यशाचे विशेष कौतुक केले. ग्रामीण भागातील आणि प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महेश जंजिरे यांची यशोगाथा प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. “परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनतीच्या जोरावर उच्च पद मिळवता येते, हे महेश यांनी सिद्ध करून दाखविले आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

महेश जंजिरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “राज्य व देशपातळीवरील स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढत असला तरी तो अजून अपेक्षेइतका नाही. अनेक विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक परिस्थिती आणि सुविधा नसल्यामुळे आपण यशस्वी होऊ शकत नाही, असा न्यूनगंड असतो. मात्र, जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण मेहनत असेल तर यश नक्की मिळते.”

त्यांच्या ओघवत्या आणि प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी महेश जंजिरे यांना अक्षरशः गराडा घालत विविध प्रश्न विचारले. स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम, अभ्यासाची पद्धत, वाचनाची सवय आणि विषयांची निवड याबाबत विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने माहिती घेतली. महेश जंजिरे यांनीही अत्यंत साध्या आणि समजण्यास सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

विशेष म्हणजे, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यात सर्वतोपरी मदत आणि मार्गदर्शन करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. त्यामुळे उपस्थित विद्यार्थी व पालकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.

महेश जंजिरे हे वरिष्ठ पत्रकार ॲड. डॅा. बाळासाहेब बोठे पाटील यांचे भाचे आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य धनंजय म्हस्के यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपप्राचार्य दादासाहेब वांढेकर, प्रा. रवींद्र देवढे, प्रा. डॉ. सुधाकर सुंबे आदींनी विशेष परिश्रम घेतले.