धनंजय कुलकर्णी यांची अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी नियुक्ती

कर्तृत्ववान आयपीएस धनंजय कुलकर्णी यांच्यावर मुंबई पूर्व विभागाची धुरा….

 

श्रीगोंदा  | दि. 21 मे 2026

गणेश कविटकर

श्रीगोंदा : तालुक्यातील भानगाव या ग्रामीण मातीतून उभारी घेत देश-विदेशात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे वरिष्ठ आयपीएस अधिकारी धनंजय कुलकर्णी यांची मुंबई पोलीस दलाच्या पूर्व प्रादेशिक विभागाच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाल्याने श्रीगोंदा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय पदोन्नतीमुळे तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

धनंजय कुलकर्णी हे महाराष्ट्र पोलीस दलातील अत्यंत अभ्यासू, कर्तव्यदक्ष आणि अनुभवी अधिकारी म्हणून ओळखले जातात. सध्या ते मुंबई विशेष शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते. कृषी पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी १९९८ मध्ये पोलिस उपअधीक्षक (DySP) म्हणून सेवेत प्रवेश केला. आपल्या प्रामाणिक कार्यशैली, धाडसी निर्णयक्षमता आणि प्रशासनातील कौशल्याच्या जोरावर त्यांनी पुढे आयपीएस पदापर्यंत मजल मारली.

मुंबईतील विविध महत्त्वाच्या पदांवर त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. दहशतवादविरोधी पथक (ATS) तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून त्यांनी प्रभावी नेतृत्व सिद्ध केले. २०१४ ते २०१६ या काळात मुंबई पोलिसांचे अधिकृत प्रवक्ते म्हणून त्यांनी अत्यंत जबाबदारीने भूमिका पार पाडली होती.

राष्ट्रीय सेवेसोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सेनेत तसेच इंटरपोलमध्ये सेवा बजावत त्यांनी आपल्या कार्यकौशल्याची छाप जागतिक स्तरावर उमटवली. नक्षलग्रस्त भागात केलेल्या धाडसी आणि उत्कृष्ट सेवेसाठी त्यांना विशेष सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले असून, त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत राष्ट्रपती पोलिस पदकानेही गौरविण्यात आले आहे.

मे २०२५ मध्ये विशेष शाखेच्या अप्पर पोलिस आयुक्तपदी नियुक्तीनंतर आता त्यांच्यावर मुंबईच्या पूर्व विभागाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ग्रामीण भागातून शिक्षण घेत कठोर परिश्रम, जिद्द आणि प्रामाणिकपणाच्या बळावर सर्वोच्च पदापर्यंत पोहोचलेले धनंजय कुलकर्णी हे आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी आदर्श ठरत आहेत.

दरम्यान कुलकर्णी हे श्रीगोंदा तालुक्यात आले असता त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्रीगोंदा तालुका पत्रकार परिषदेचे अध्यक्ष अमोल गव्हाणे, सुहास कुलकर्णी, गणेश कविटकर, उद्योजक भूषण बगाडे, वैभव खेंडके , संतोष टकले उपस्थित होते.