श्रीगोंद्यात जनगणना प्रगणक व पर्यवेक्षक प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न

श्रीगोंदा | दि. 10 मे 2026

गणेश कविटकर

जनगणना 2027 अंतर्गत ग्रामीण भागातील घरगणना प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या प्रगणक व पर्यवेक्षकांचे 12 दिवसीय प्रशिक्षण शिबिर श्रीगोंद्यातील महाराजा जीवाजीराव शिंदे महाविद्यालय येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

16 मे ते 14 जून दरम्यान पार पडणाऱ्या पहिल्या टप्प्यातील घरगणना कामकाजासाठी श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रासाठी एकूण 597 प्रगणक व पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अनुषंगाने 23 एप्रिल ते 8 मे या कालावधीत चार बॅचमध्ये प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक बॅचमध्ये सुमारे 150 प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणात 510 प्रगणक व 87 पर्यवेक्षकांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

प्रशिक्षण शिबिरास उपजिल्हाधिकारी विनीत शिर्के,उपविभागीय अधिकारी श्रीगोंदा-पारनेर कुमार चिंचकर, तहसिलदार सचिन डोंगरे, यांनी भेट देऊन प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. जनगणना प्रक्रियेचे महत्त्व, अचूक माहिती संकलनाची आवश्यकता आणि नागरिकांशी संवाद साधताना घ्यावयाची काळजी याबाबत त्यांनी सूचना दिल्या.

या शिबिरात प्रशिक्षक म्हणून उत्तरेश्वर मोहळकर, राजेंद्र येवले, राजेंद्र ठुबे, प्रवीण तांबे, राजेंद्र पवार, शिवलिंग गेरंगे, हरिभाऊ वाघीरे आणि प्रदीप उंडे यांनी फील्ड ट्रेनर म्हणून काम पाहिले. त्यांनी जनगणना प्रक्रियेबाबत सखोल मार्गदर्शन करत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे प्रशिक्षणार्थींना फील्डवरील कामकाजाची माहिती दिली.

शिबिरादरम्यान श्रीगोंदा नगरपरिषद मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत, गटविकास अधिकारी राणी फराटे तसेच गटशिक्षणाधिकारी कुसुमकुमारी कानडी यांनी सदिच्छा भेट देऊन प्रशिक्षणार्थींचे मनोबल वाढविले.

मा. तहसिलदार सचिन डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली जनगणना सहाय्यक चार्ज अधिकारी संतोष झाडे, अतिरिक्त चार्ज अधिकारी तथा निवासी नायब तहसिलदार मिलिंद जाधव आणि जनगणना सहाय्यक प्रकल्प अधिकारी किशोर किसवे यांनी प्रशिक्षणाचे नियोजन यशस्वीपणे पार पाडले.