चिखलीत ज्येष्ठांचा कृतज्ञता सोहळा; १६३ ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानाने गाव दुमदुमले

आईच्या संघर्षातून प्रेरणा घेत रामदास झेंडे मित्रमंडळाचा समाजाला आदर्श संदेश

श्रीगोंदा | दि. 21 मे 2026

गणेश कविटकर

आयुष्यभर कष्ट, त्याग आणि संस्कारांची शिदोरी पुढील पिढीला देणाऱ्या ज्येष्ठांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा भावनिक आणि प्रेरणादायी सोहळा चिखली येथे उत्साहात पार पडला. माता लिलाबाई झेंडे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त रामदास झेंडे मित्रमंडळाच्या वतीने विविध जाती-धर्मातील तब्बल १६३ ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला. या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे संपूर्ण परिसरात सामाजिक ऐक्य, संस्कार आणि माणुसकीचा संदेश पोहोचला.

ज्येष्ठांचा सन्मान पांडुरंग क्षीरसागर महाराज, बाळासाहेब नाहाटा आणि राजेंद्र म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस, सोपानराव मुळे यांच्यासह अनेक मान्यवर या सोहळ्यास उपस्थित होते. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गा तांबे तसेच ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मणराव ढोबळे यांनी शुभेच्छा देत उपक्रमाचे कौतुक केले.

अध्यक्षीय भाषणात पाटीलकाका महाराज म्हणाले, “आजची पिढी शिक्षण आणि नोकरीसाठी दूरदेशी जात असताना अनेक आई-वडिलांना वृद्धाश्रमाचा आधार घ्यावा लागतो. अशा काळात ज्येष्ठांचा सन्मान करून रामदास झेंडे मित्रमंडळाने समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. प्रत्येकाने आपल्या आई-वडिलांप्रती प्रेम, आदर आणि जिव्हाळा जपला पाहिजे.”

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भोस यांनी भावना व्यक्त करताना सांगितले, “चिखलीकरांनी माझ्या राजकीय प्रवासाला मताधिक्याची ताकद आणि विचारांची साथ दिली. राजकीय संन्यासानंतर याच मातीत झालेला हा सन्मान माझ्यासाठी अत्यंत भावनिक क्षण आहे.”

रामदास झेंडे यांनी आपल्या मनोगतात आईच्या संघर्षाची आठवण करून देताना सांगितले, “वडिलांचे छत्र लवकर हरपल्यानंतर आईने काळ्या मातीत घाम गाळून आम्हाला उभे केले. तिच्या त्यागातूनच ज्येष्ठांविषयी आदराची भावना मनात निर्माण झाली आणि त्यातूनच या सन्मान सोहळ्याची प्रेरणा मिळाली.”

यावेळी बाळासाहेब नाहाटा, राजेंद्र म्हस्के, दिनकर पंधरकर, पुरुषोत्तम लगड, नवनाथ बोडखे, संजय धामणे, संतोष पंधरकर, पोपटराव पवार आणि राणी झेंडे यांनीही मनोगते व्यक्त करत उपक्रमाचे कौतुक केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आनंदाश्रम स्वामी आणि रामेश्वर तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. शंकर गवते यांनी केले तर आभार रमेश झेंडे यांनी मानले.