धर्मवीर गडावर बलिदान सप्ताह भावपूर्ण वातावरणात; हजारो शंभू भक्तांची मूक पदयात्रा

श्रीगोंदा | दि. 19 मार्च 2026

गणेश कविटकर

 

हिंदवी स्वराज्याचे तेजस्वी आणि पराक्रमी राजा छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील धर्मवीर गडावर आयोजित करण्यात आलेला बलिदान सप्ताह अत्यंत भावपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज बलिदान सप्ताह समितीच्या वतीने आयोजित या सप्ताहात विविध धार्मिक, सामाजिक आणि प्रेरणादायी उपक्रमांमुळे संपूर्ण परिसर शंभू भक्तीने भारावून गेला.

या सप्ताहादरम्यान व्याख्यानमाला, कीर्तन, जोशपूर्ण पोवाडे तसेच रक्तदान शिबिरासारखे समाजोपयोगी कार्यक्रम पार पडले. प्रत्येक उपक्रमातून धर्मवीरांच्या बलिदानाची गाथा आणि हिंदवी स्वराज्याची प्रेरणा जनमानसात रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मंगळवारी सायंकाळी धर्मवीर संभाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी काढण्यात आलेल्या मूक पदयात्रेत हजारो शंभू भक्तांनी उत्स्फूर्त सहभाग घेत परिसर भक्तिमय झाला. ‘जय शंभूराजे’च्या घोषणांनी वातावरण दणाणून गेले, तर अनेकांच्या डोळ्यांतून अश्रूही ओघळताना दिसले.

यावेळी हभप मनोहर (मामा) भोसले यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, समितीने सुरू केलेला हा बलिदान सप्ताह तरुणाईमध्ये नवी चेतना निर्माण करत असून, आज पेरलेले हे संस्काराचे बीज भविष्यात भव्य वटवृक्षात रूपांतरित होईल. हिंदू समाज एकत्र येऊन संकटांचा सामना करण्याची ताकद मिळावी, यासाठी राजा-महाराजांच्या इतिहासातून प्रेरणा घेणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

धर्मवीर गडावर येताना प्रत्येकाच्या मनात दुःखाची भावना दाटून येते, परंतु त्याचवेळी या पवित्र भूमीचा अभिमानही उंचावतो. हा गड हिंदू अस्मितेचे जाज्वल्य प्रतीक असून शासनाने या ऐतिहासिक स्थळाचा सर्वांगीण विकास करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

धर्मवीरांच्या बलिदानाची आठवण करून देणारा हा सप्ताह केवळ एक कार्यक्रम नसून, तो प्रत्येकाच्या मनात राष्ट्रभक्ती, स्वाभिमान आणि एकतेची ज्योत प्रज्वलित करणारा ठरला.