श्रीगोंद्यात गुढीपाडव्याच्या निमित्ताने रामानंद संप्रदायाची भव्य व शिस्तबद्ध शोभायात्रा उत्साहात संपन्न

श्रीगोंदा | दि.19 मार्च 2016

गणेश कविटकर

श्रीगोंदा : हिंदू नववर्षाच्या शुभारंभाचे प्रतीक असलेल्या गुढीपाडवा निमित्त जगद्‌गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज स्थापित रामानंद संप्रदायाच्या वतीने श्रीगोंदा येथे भव्य, दिमाखदार व शिस्तबद्ध शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. या शोभायात्रेत हजारो अनुयायांनी उत्स्फूर्त सहभाग घेत हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा देतानाच विविध सामाजिक विषयांवर प्रभावी संदेश देत जनजागृती केली.

श्रीगोंद्यासह महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा व कर्नाटक या राज्यांतील विविध जिल्ह्यांमध्येही अशाच प्रकारच्या शोभायात्रा मोठ्या उत्साहात पार पडल्या. या शोभायात्रेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे ती अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने रस्त्याच्या एका बाजूने, एकाच रेषेत, ताल-लयबद्ध भजनांच्या गजरात व ढोल-ताशांच्या निनादात पुढे सरकत होती.

शोभायात्रेत सहभागी भाविकांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून उत्सवाला विशेष रंगत आणली. महिला भगिनींचा मोठ्या संख्येने सहभाग लक्षवेधी ठरला. कलशधारी महिला, भगवे ध्वजधारी, विविध सांस्कृतिक नृत्यप्रकार तसेच सामाजिक विषयांवरील देखावे हे शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण ठरले.

तरुण, युवती, पुरुष व महिला अशा सर्व वयोगटांतील भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग या यात्रेत दिसून आला. आयोजकांकडून सहभागींच्या सुरक्षिततेची व सोयी-सुविधांची योग्य ती काळजी घेण्यात आली होती.

जगद्‌गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने रामानंद संप्रदायामार्फत समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत. यामध्ये महामार्गावरील अॅम्ब्युलन्स सेवा, मरणोत्तर देहदान व अवयवदान, गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत CBSE शिक्षण, सर्व जाती-धर्मातील मुलांसाठी मोफत वेदपाठशाळा, रक्तदान शिबिरे, व्यसनमुक्ती अभियान तसेच आपत्कालीन सेवा व दुर्बल घटकांचे पुनर्वसन यांचा समावेश आहे.

या सर्व समाजहितकारी कार्यामुळे रामानंद संप्रदायाबद्दल समाजाच्या सर्व स्तरांतून कौतुक व प्रशंसा व्यक्त होत असून, धार्मिकतेसोबत सामाजिक बांधिलकी जोपासणारा हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.