कर्जत | दि. 20 मार्च 2026
गणेश कविटकर
कोंभळी (ता. कर्जत) : ॐ चैतन्य कानिफनाथ मंदिराच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त गावात भव्य कीर्तन महोत्सव व नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या कार्यक्रमास ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजी यांचे विशेष मार्गदर्शन लाभत आहे.
या कार्यक्रमाचा प्रारंभ रविवारी, दि. २२ मार्च २०२६ रोजी होणार असून समारोप गुरुवारी, दि. २६ मार्च २०२६ रोजी होणार आहे. या कालावधीत दररोज सायंकाळी ७ ते ९ या वेळेत कीर्तनसेवा आणि रात्री ९ ते ११ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
कीर्तन महोत्सवात विविध नामवंत कीर्तनकारांची उपस्थिती लाभणार आहे. रविवारी ह.भ.प. अभिनाथ महाराज साळुंके (श्री टाकळी फेम), सोमवारी ह.भ.प. कचरू महाराज आत्तार (शिवपरीकर), मंगळवारी ह.भ.प. संतोष महाराज वनवे, बुधवारी ह.भ.प. निलेश महाराज चव्हाण तसेच गुरुवारी ह.भ.प. सोपान महाराज सानप यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.
या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन ॐ चैतन्य कानिफनाथ महाराज ट्रस्ट, कोंभळी व समस्त ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले असून जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
